पान:अन्वयार्थ - १ (Anvayarth -1).pdf/367

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.






बिल क्लिंटन यांची कुऱ्हाड!


 मेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष जॉर्ज वॉशिंग्टन यांच्या बालपणाची एक कथा, शालेय पाठ्यपुस्तकापर्यंत पोचली असल्यामुळे मोठी मशहूर आहे. बाळ जॉर्जच्या हाती एक कुऱ्हाड लागली. कुऱ्हाडीच्या घावाने झाडे फटाफट तुटतात, खाली येतात याचे त्याला कौतुक वाटले, दिसेल ते झाड तोडून टाकण्याचा सपाटा त्याने लावला. त्यात त्याच्या वडिलांच्या लाडक्या झाडाचाही बळी गेला, वगैरे वगैरे.
 अमेरिकेचे सध्याचे अध्यक्ष वयाने अत्यंत तरुण आहेत. पहिल्या अध्यक्षांच्या बालपणातील उपद्व्याप त्यांचे आजचे बालिश वारस चालवत आहेत, की काय अशी शंका यावी, अशा अलीकडच्या घटना आहेत.
 पुथ्वीच्या गोलाची पूर्वेकडून पाहणी सुरू करू.
 उगवत्या सूर्यावर झेप

 जपानः जगातील सगळ्यांत वेगाने प्रगती करणारा देश. जपानी मालाच्या आक्रमणाने अमेरिकन कारखानदार भयग्रस्त झाले. बहुतेक सगळ्या देशांना महासामर्थ्यशाली वाटणारा डॉलर झुकतो तो फक्त जपानी येनपुढे. जपानने आपली आयात वाढवावी आणि निर्यात कमी करावी यासाठी अमेरिकन राष्ट्राध्यक्षांनी प्रचंड दबाव आणला आहे. दुसऱ्या महायुद्धानंतर देशाची पुनर्बांधणी करण्यासाठी जपानने उद्योजकांना अनेक सोयी सवलती दिल्या होत्या. त्या बऱ्याच अंशी आजतागायत चालूच आहेत. आर्थिक शिखरावर पोचल्यानंतर जुन्या व्यवस्था चालू ठेवणे जगाला मान्य होणार नाही, हे उघड आहे. सुधारणा करण्यासाठी जपानी पंतप्रधान होसोकावा यांची धडपड चालू आहे; पण जपानी संसदेत सुधारणांना भरभक्कम विरोध होतो आहे. अमेरिकन दबावांमुळे तेथील सरकार कोसळण्याचा धोका निर्माण झाला आहे. व्यापाराच्या अटीसंबंधीची कुऱ्हाड जपानवर चालवली जाते तशीच हिंदुस्थानसारख्या व्यापारीदृष्ट्या फालतू देशावरही.

अन्वयार्थ - एक / ३६८