पान:अन्वयार्थ - १ (Anvayarth -1).pdf/364

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

संताप आणि तिरस्कार आणि कोर्टामध्ये कडक सजा. धारेच्या पात्याने खिसा कापणाऱ्या पोराला लोकांची मारहाण, पोलिसांची मारपीट आणि वर तुरुंग; पण लेखणीच्या शाईने किंवा कॉम्प्युटरच्या आधाराने हजारो कोटी रुपयांना गंडा घालणाऱ्या हर्षदबद्दल मात्र वेगळीच भावना, मुंबईला आता 'हर्षद फॅन' क्लब निघाले आहेत. "शेअर बाजार का एकही मर्द, हर्षद हर्षद" अशा घोषणांचे फलक जागोजाग लागत आहेत.
 दीड दांडीचा तराजू
 नैतिक काय? अनैतिक काय? कोणते कर्म म्हणजे गुन्हा? त्याची गंभीरता काय? आणि शिक्षा काय? या विषयीच्या कल्पना, नियम आणि कायदे पैसेवाल्यांच्या आणि लेखणीवाल्यांच्या मोठ्या सोयीसोयीने बनवले आहे. सुरा, बंदूक वापरली तर फाशी, तोच गुन्हा लेखणी वापरून केला तर जास्तीतजास्त वर्षा-दोन वर्षांची सजा! जमिनीच्या वादावरून डोक्यात कुऱ्हाड घालून अडाणी शेतकऱ्याने खून केला, तर त्याची फाशी निश्चित; पण तीच मनुष्यहत्या एखाद्या सुशिक्षित माणसाने पिस्तुलाने किंवा विषप्रयोगाने केली, तर जास्तीतजास्त जन्मठेपेने सुटणार! चार हजार कोटीची भानगड करणाऱ्या हर्षद मेहताला कायद्याच्या तरतुदीनुसार जास्तीतजास्त चार-पाच वर्षांची शिक्षा होऊ शकते. तेवढीदेखील प्रत्यक्षात व्हायची नाही. भरपाईपोटी दंड आणि दोनएक वर्षांची शिक्षा म्हणजे कमाल होईल. तेदेखील तो कमी शिकलेल्या गरिबाचा मुलगा म्हणून. उच्च शिक्षित, देशातील सर्वोच्च पदांना विभूषित केलेल्या कृष्णमूर्तीना तेवढीसुद्धा शिक्षा व्हायची नाही.
 अपहार अडाण्यांनी केला तर शिक्षा कठोर, शहण्यांनी केला तर शिक्षा हलकी. खिसा कापणाऱ्या पोराला जीवघेणा मार, खोटे कागदपत्र करून घपला करणाऱ्याचा प्रसंगी जयजयकार, अशी काही विचित्र व्यवस्था आहे.
 अदंड्य ब्राह्मण

 मुसलमानी अमलात इस्लामच्या पाक बंद्यांकरिता वेगळा कायदा आणि काफिरांकरिता वेगळा दंड अशी व्यवस्था होती. मनुस्मृतीत शुद्राला साध्या चोरीकरितासुद्धा अमानुज शिक्षा; पण ब्राह्मणमात्र अदंड्य, असे स्पष्टच सांगितले आहे. औरंगजेबाच्या आणि मनुच्या व्यवस्थांविषयी वाचताना आज मोठे चमत्कारिक वाटते; पण असाच दीड दांडीचा तराजू न्यायव्यवस्थेत आजही आहे. सुशिक्षितांनी केलेला गुन्हा गुन्हाच नाही, असे ठरवणाऱ्या नीतीमत्तेची आणखी काही गमतीची उदाहरणे देता येतील.

अन्वयार्थ - एक / ३६५