पान:अन्वयार्थ - १ (Anvayarth -1).pdf/361

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 धनदांडगे नोकरदार
 प्राध्यापक आणि शिक्षक बिचारे तसे निरागस! विद्यार्थ्यांचे पालक बिचारे परीक्षेच्या वेळी नापासाचा पास करण्याकरिता किंवा विशेष गुण देण्याकरिता देतील तेवढीच वरकमाई. विनावरकमाईच्या या पदासाठीही वीस-पंचवीस हजारांची पागडी द्यावी लागते; मग पोलिस, महसूल, जंगल, अबकारी, आयकर अशा वरकमाईची लयलूट असलेल्या खात्यांबद्दल काय विचारावे! दरवर्षी फौजदारांच्या भरतीच्या वेळी पागडीचा भाव फुटतो. नेमणूक झाल्यानंतरही, विशिष्ट पदावर विशिष्ट जागी नेमणूक व्हावी म्हणून वेळोवळी पागडी द्यावी लागते, हे सर्वज्ञात आहे. कुणी नाकारू शकत नाही. महाराष्ट्रातल्या वाहतूक नियंत्रकाच्या एका जागी नेमणूक होण्याकरिता लाखो रुपये द्यावे लागतात अशी वदंता आहे. या पदासाठी, जागांसाठी, पागडी द्यावी लागते याचा अर्थ येथे काळाबाजार आहे, खोटेपणा आहे.
 मी दरवर्षी भारतीय प्रशासन सेवेच्या मसुरी येथील अकादमीत नव्याने निवड झालेल्या अधिकाऱ्यांसमोर भाषण देण्याकरिता जातो. या भेटीच्या संधीचा फायदा घेऊन नव्या तरुण अधिकाऱ्यांना भेटतो. गेली चार वर्षे निवड झालेल्या अधिकाऱ्यांबद्दल एक अद्भुत गोष्ट आढळली, इतकी सारी वर्षे प्रशासन सेवेत येणारे तरुण हे कला, वाणिज्य या शाखांचे असत. काही थोडेफार शास्त्र, गणित शाखांचेही असत. या चार वर्षांत प्रशासन सेवेची परीक्षा उतीर्ण होणाऱ्यांमध्ये सगळ्यांत मोठा गठ्ठा इंजिनिअर, डॉक्टर तरुणांचा आहे. म्हणजे १२ वी च्या परीक्षेत ९०%च्या आसपास मार्क मिळवलेले, अभियांत्रिकी किंवा वैद्यकीय महाविद्यालयात महामुश्किल असा प्रवेश मिळवलेले, कठीण तांत्रिक अभ्यासक्रम यशस्वीरित्या उतीर्ण केलेले हे विद्यार्थी प्रशासनात का येऊ पाहतात? समाजाने यातील प्रत्येकाच्या शिक्षणासाठी वीस-वीस लाख रुपये खर्च केला आहे. इंजिनिअर किंवा डॉक्टर बनल्यानंतर या क्षेत्रात उच्च शिक्षणाची मिळालेली संधी, समाजाची त्यांच्यातील गुंतवणूक, सगळे सोडून हे तरुण लिखापढीच्या प्रशासकीय सेवेत येऊ पाहतात.

 त्यांच्याशी याबद्दल मी चर्चा केली. त्यांनी जी हुन्नर बाणवली आहे. तिचा उपयोग करून ते स्वतंत्र व्यवसाय किंवा निदान त्यांच्या क्षेत्रातील नोकरी का करत नाही? त्यांचे उत्तर अगदी प्रामाणिक. आय.ए.एस.च्या पदांमध्ये पगार भरपूर आहे. रुबाब आहे. सत्ता आहे. वरकमाईला मर्यादा नाही, काहीही धोका नाही, आयुष्यभराची शाश्वती आहे, तेव्हा इंजिनिअर, डॉक्टरी असल्या उरस्फोडी

अन्वयार्थ - एक / ३६२