पान:अन्वयार्थ - १ (Anvayarth -1).pdf/360

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

संप केले, आंदोलने केली आणि आपले वेतन, भत्ते, सोयी, सवलती वाढवून घेतल्या. निरुपद्रवी बुद्धिजीवी म्हणून सर्वसामान्य लोकांना त्यांच्याबद्दल सहानुभूती होती. शिवाय, प्राध्यापक मंडळी त्यांच्या त्यांच्या विषयातली तज्ज्ञ समजली जातात म्हणून त्यांचा काहीसा दबदबाही असतो. पुढारी मंडळी पत्रकारांना जशी नाराज करीत नाहीत तशीच प्राध्यापक मंडळींनाही नाखूष करू इच्छित नाहीत. प्राध्यापक, शिक्षक मंडळींचे पगार वाढत गेले आणि आज स्थिती अशी आहे, की प्रशासन सेवेपेक्षासुद्धा प्राध्यापकाची नोकरी जास्त आकर्षक मानली जाते. आठवडी सुटी, दिवाळीची सुटी, उन्हाळ्याची सुटी, नाताळची सुटी, गॅदरिंगची सुटी, दर दिवसाला जास्तीत जास्त तीनचार तास. शिक्षण व्यवस्थेचे स्वरूप असे, की व्यासंग ठेवणे आवश्यक नाही. शिकवण्याची मिळकत, परीक्षांच्या काळात वरकमाई, महाविद्यालयात दरारा, समाजात आदर, जबाबदारी नाही, धोका नाही अशा पदांकरिता धावपळ चालू असते. प्राध्यापकांच्या अर्जाबरोबर चिठ्या जोडलेल्या असतात. "माझी नेमणूक झाल्यास तीन वर्षे विनापगार काम करण्याची तयारी आहे." "नेमणूक झाल्यास महाविद्यालयास पंचवीस हजार रुपये देण्याची माझी तयारी आहे." इ.इ.
 स्वातंत्र्योत्तर काळात, नियोजनाच्या अर्थव्यवस्थेत, संघटनशक्तिच्या ताकदीवर प्राध्यापक मंडळींनी त्यांच्या वास्तविक मूल्यापेक्षा अवाच्या सवा फायदे पदरात पाडून घेतले. हा खोटेपणा प्राध्यापक पदांच्या काळ्या बाजारात उघडा पडतो.
 शिक्षकांची चंगळ
 साध्या शिक्षकाची नोकरी मिळवायलासुद्धा आता वीस वीस हजार रुपये द्यावे लागतात. एकदा शिक्षकाची नोकरी मिळाली, की दोन हजार रुपयांच्या आसपास पगार मिळू लागतो. म्हणजे आयुष्यभर ददात म्हणून नाही. नेमणुकीच्या वेळी केलेला खर्च हुंड्यात भरून निघतो आणि दुसऱ्या एखाद्या शिक्षिकेशी विवाह जमला आणि नवरा बायको दोघांचाही पगार चालू झाला म्हणजे चंगळच चंगळ!

 मध्ये एक बातमी आली होती, जिल्हा परिषदेच्या शाळेतील एका बहाद्दर शिक्षकाने आपल्या जागी काम करायला पाचशे रुपयांवर दुसरा चांगला माणूस नेमला आणि तो स्वतः शाळेकडे पगाराचा दिवस सोडून, न फिरकता व्यापारउदीम करू लागला. पाचशे रुपयांवर काम करणारा शिक्षक अधिक चांगला शिकवत असल्यामुळे विद्यार्थ्यांनीही तक्रार केली नाही. थोडक्यात आजच्या परिस्थितीत पाचशे नाहीतर जास्तीत जास्त हजार रुपये हा शिक्षकांकरिता खरा पगार आहे. वरचा सगळा खोटा व्यवहार!

अन्वयार्थ - एक / ३६१