पान:अन्वयार्थ - १ (Anvayarth -1).pdf/354

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

अशी परिस्थिती आहे. त्यामुळे भ्रष्टाचारी सगळीकडे खुलेआम फिरतात, डौलाने फिरतात. भ्रष्टाचार पूर्वीही होता, आताही आहे. भ्रष्टाचार करणाऱ्याला आता प्रतिष्ठा आली आहे. भल्या मोठ्या थाटांच्या सभेत या ना त्या वाममार्गाने अफाट पैसे मिळणारे लोक उजळ माथ्याने वावरतात. स्वार्थ त्यागाच्या गोष्टी बोलतात राष्ट्रहिताच्या बाता करतात. तुकाराम, ज्ञानदेवांचे नाव घेतात आणि सारी जनता हताशपणे पाहत राहाते. काय करणार? एका एका माणसाचे कुलंगडे बाहेर काढायचे, साक्षीपुरावा गोळा करायचा, कोर्टात न्यायचा, सगळा भ्रष्टाचार सिद्ध करायचा हे कष्टाचे आहेच; पण प्रचंड खर्चाचे आहे आणि पुढाऱ्याने डूख धरला तर कदाचित जीवाशी गाठ आहे. कोण हा उपद्व्याप करणार? पोलिसच भ्रष्टाचाराचे आगार झाले. न्यायालये तशीच, एखादा दुसरा पत्रकार सोडला, तर सारी वर्तमानपत्रे भ्रष्टाचाऱ्यांच्याच मालकीची. कोण याविरुद्ध दंड थोपटून उभा राहणार?
 साठ कोटी रुपयांच्या बोफोर्सने जनात उद्रेक घडला नाही. हजारो कोटी रुपयांच्या शेअर बाजार प्रकरणी तर गुन्हेगारांचा जयजयकार होतो आहे. मंडल आयोगानेमात्र देश पेटला. कारण उघड आहे, तुकामाच्या भाषेत नीचापुढे नाचायची आमची तयारी आहेच, त्याचा विरोध कोण करेल. सरकारी नोकरी म्हणजे भ्रष्टाचाराची गंगा! त्यात हात धुवून घेण्यासाठी चढाओढ आहे. मंडल आयोगाने वणवा पेटला याचे खरे कारण, "भ्रष्टाचारी आम्हा सोयरे..."

■ ■

अन्वयार्थ - एक / ३५५