पान:अन्वयार्थ - १ (Anvayarth -1).pdf/353

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

बेताबेताने व्यक्त होतो. पंचायत समिती, जिल्हापरिषदेच्या अमक्या अमक्याने अमाप पैसा केला आहे, हे ते मोठ्या उदासीनतेने एकमेकांना सांगतात. अमका आमदार निवडणुकीच्या आधी बिडीला महाग होता; पण त्याचे आता दोनचार दारूचे गुत्ते झाले, शहरातील बंगला झाला हे सांगतानासुद्धा कुठे आक्रोश किंवा क्रोध दिसत नाही. राज्य पातळीवरचा एखादा नेता आठशे हजार कोटी रुपये बाळगून आहे असा उल्लेख झाला म्हणजे त्या नेत्याबद्दल काहीशी आदराचीच भावना तयार होते.
 नीचापुढे ते नाचवी
 इतिहासाचार्य वि. का. राजवाडेंनी म्हटले आहे, की गेली हजारो वर्षे शेतकऱ्यांची अशी निश्चित भावना झाली आहे, की जे जे म्हणून सरकार असते ते ते शेतकऱ्यांना लुटण्याकरिताच असते, तेव्हा प्रत्येक सरकारी हुद्देदार आपल्याला लुटतो त्यात आश्चर्य ते काय? अशी त्यांची भावना असते. अमका चेअरमन अमाप पैसा कमावून आहे, भरमसाठ पितो आणि मनाला येईल त्या आयाबहिणीवर हात टाकतो असे ऐकले तरी चालायचेच की हो! राजाने असे करायचे असते, अशी शेतकऱ्यांची सर्वमान्य प्रतिक्रिया असते.
 स्त्रियांच्या वेगवेगळ्या समस्यांची पाहणी करून अभ्यास करणाऱ्यांचा एक अनुभव आहे. बाया शहरातल्या असोत, खेडेगावातल्या असोत, प्रश्नावलीतून त्यांना एखादा प्रश्न विचारला, तर त्या आधी उत्तरे द्यायला तयार नसतात. त्यातली एखादी थोडी धाडसी बाई बोलायला तयार झालीच तर ती मोठ्या सावधपणे बोलते. आपण दिलेले उत्तर चारचौघांत बरे दिसेल ना? सासूबाईच्या, मालकांच्या कानावर गेले तर ते नाराज होणार नाहीत ना? आणि दिलेल्या उत्तरराकारणे उद्या आपल्या पाठीवर वळ तर उठणार नाही ना? असा हिशेब मांडीत मोठ्या हुशारीने पाहणी करणाऱ्यांच्या प्रश्नांना त्या उत्तरे देतात.
 घरात परिस्थिती बायांची, तीच समाजात शेतकऱ्यांची. तलाठ्याविरुद्ध राग व्यक्त करून उद्या त्याच्याच समोर जायची वेळ येणारच आहे, मग जमेल? आमदाराने नंगा नाच घातला तर घालो, आपण त्याच्याविरुद्ध ब्र काढला आणि त्याच्या कानावर गेले तर उद्याचे काय? सगळीकडेच भ्रष्टाचार माजला आहे, त्याच्यात आपल्या जातीचा, आडनावाचा एखादा जिल्हा गाजवतो आहे, भ्रष्टाचारात का होईना 'ऑल इंडियात' पहिला आहे. याच्या खेरीज अभिमान बाळगण्यासारखे त्यांच्या आयुष्यात असतेच काय?

 थोडक्यात, भ्रष्टाचाराविषयी शहरात आपुलकी आणि खेडेगावात उदासीनता

अन्वयार्थ - एक / ३५४