पान:अन्वयार्थ - १ (Anvayarth -1).pdf/351

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.



भ्रष्टाचारी आम्हा सोयरे...


 माजी पंतप्रधान विश्वनाथ प्रतापसिंग यांच्याबरोबर पाटणा आणि अलाहाबाद येथील दोन सभांना उपस्थित राहण्याचा मला अनुभव आला अन् १९८९-९० या काळात बोफोर्स प्रकरणातील भ्रष्टाचाराचा विषय सगळ्या देशात गाजत होता. हे सगळे प्रकरण व्ही. पी. सिंग यांनी प्रकाशात आणले एवढेच नव्हे, तर या प्रकरणाचा पाठपुरावा करण्याकरिता त्यांना काँग्रेस पक्ष सोडावा लागला. त्यामुळे लोकांत त्यांच्याविषयी आकर्षण होते. हजारोंनी लोक त्यांच्या सभांना जमत आणि प्रत्येक सभेत विश्वनाथ प्रतापसिंग बोफोर्स प्रकरण, त्यातील भ्रष्टाचार आणि त्यावेळचे पंतप्रधान राजीव गांधी यांचा या प्रकरणातील हात या विषयावर तपशीलवार बोलत.
 मंचावर बसलेला असल्यामुळे समोर बसलेल्या अफाट समुदायातील लोकांकडे पाहणे मला अपरिहार्यच होते. त्यांच्या चेहऱ्यावरील हावभावांचे मी बारकाईने निरीक्षण करत होतो. एक मोठी चमत्कारिक गोष्ट माझ्या लक्षात आली. राजीव गांधीवर, देशाच्या पंतप्रधानांवर खुलेआम भ्रष्टाचाराचा आरोप जाहीर सभेत केला जात होता; पण त्या सगळ्या प्रतिसादात काही तरी कमी होते. तमाशातील एखाद्या चांगल्या संवादाला प्रेक्षकांनी दाद द्यावी तसा तो प्रतिसाद होता. देशाचा नेता भ्रष्टाचारात गुंतला आहे असे म्हटल्यावर जीवाचा संताप व्हावा, पोटतिडकीने जीवाचा आकांत करून उठावे अशी काही समोर बसलेल्या समुदायाची प्रतिक्रिया नव्हती, हा काय चमत्कार आहे?
 मग एकदम माझ्या लक्षात आले, की या लोकांच्या मनात भ्रष्टाचाराविषयी चीड तर नाहीच, असली तर थोडी आपुलकीच आहे.

 सभा प्रामुख्याने शहरवासियांची, म्हणजे उपस्थितात नोकरदार व्यापारी, विद्यार्थी इत्यादींचा भरणा यांच्यापैकी प्रत्येकाचे जगणे कुठेतरी भ्रष्टाचाराशी

अन्वयार्थ - एक / ३५२