पान:अन्वयार्थ - १ (Anvayarth -1).pdf/342

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

जनसमुदायावर अशी मोहिनी टाकण्याची एखादी विद्या आपल्याला येत असती तर असे सहज वाटून जाते. एक अपवाद थोरल्या महाराजांचा. त्यांच्या जागी आपण असल्याची कल्पना करणेदेखील अक्षम्य पाप वाटते. पु.लं.च्या 'गुळाचा गणपती' कथेतील नायक आपण कधी गायक, कधी चित्रकार, कधी निष्णात शल्यचिकित्सक असल्याच्या कल्पना करतो आणि स्वतःच्या कल्पनासृष्टीत रंगून जातो. 'याच्या जागी आपण असतो तर!' असा सुखद विचार ज्यांच्याबद्दल येतो त्या माझ्या विभूती. माझ्या लेखी याच्यावरचे पद नाही.
 कोण बाबा महाराजांच्या कृपेने किंवा चमत्काराने भारून गेलेले भक्तलोक बाबांचा विषय निघाला, की थोड्या दबलेल्या आवाजात गंभीपणे बोलू लागतात, अशा तऱ्हेची विभूतीपूजा आता फक्त भक्तमंडळीतच दिसते. विज्ञानयुगात अशी विभूतीपूजा मतिमंदातच सापडायची! ज्यांची विचारशक्ती अजून शाबूत आहे त्यांच्या बाबतीत विभूतीतत्त्वाची कमाल मर्यादा म्हणजे यांच्यासारखे आपल्याला जमले असते तर! असे ज्यांच्याबद्दल वाटते त्या विभूती.
 मनाचा सहज कौल, 'अल्ड्स हक्सले'
 पत्रकार मित्रांना माझ्या या असल्या लांबलेल्या प्रस्तावनेत काहीच स्वारस्य नव्हते. "पण तरी तुमचे हिरो कोण?" विचार करायला फारसा वेळ नव्हता. आयुष्यात भेटलेल्या किंवा पुस्तकरूपाने परिचय झालेल्या व्यक्ती आणि इतिहासाच्या पानात ज्यांच्या यशोगाथा अजरामर झाल्या आहेत अशा अनेक नावांची यादी करावी. मग त्यात प्राथमिक छाटणी, दुय्यम छाटणी असे करीत करीत नेमके उपान्त्य फेरीपर्यंत पोचलेल्या लोकांची नावे काढावी, असे सगळे व्यवस्थितपणे करायला फुरसदच नव्हती. नावे दोन चार सेकंदात नेमकी निवडणे अशक्यच होते, तरी मी उत्तर दिले आणि जे उत्तर माझ्या तोंडून आले त्याने माझे मलाच आश्चर्य वाटते आहे.
 उत्तर बारकाई विचार करून दिलेले नाही. ते असेच माझ्या तोंडून निघाले. आता विचार करायला बसलो तर मला ज्यांच्या जागी असणे आवडले असते. अशा व्यक्तींची लांबलचक यादी करता येईल. ज्योतिबा फुले, हो ची मिन्ह, मार्गारेट थॅचर, अहिल्याबाई होळकर अशी कितीतरी नावे जमा होतील; पण ऐनवेळी मी पहिले नाव दिले ते 'अल्डस हक्सले' यांचे.

 मोठे उत्तर आणि मुलाखत वर्तमानपत्रात छापून आली. रंगीबेरंगी फोटो माझाही आणि 'अल्डस हक्सले'चाही आणि मला अगदी धन्य धन्य वाटले. हक्सले यांना मनातील पहिली विभूती म्हणून उत्स्फूर्तपणे मी का जाहीर केले?

अन्वयार्थ - एक / ३४३