पान:अन्वयार्थ - १ (Anvayarth -1).pdf/341

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

मित्रांनी भरकस कोशीश केली आहे. शरीर कमावण्यासाठी एखाद्या पहिलवानाने मेहनत करावी, खुराक घ्यावा तशी आम्हा मेंदूच्या पहिलवानांची धडपड. त्याकाळी चाणक्य आणि आद्य शंकराचार्य या विभूती आणि भगवत्गीता हा ग्रंथ यांच्याबद्दल माझ्या मनात अपार श्रद्धा होती. एकदा सहज माझ्या मनात प्रश्न आला की, "हिंदू ब्राह्मण घरात जन्मलो नसतो तर या व्यक्तींना आणि या ग्रंथाला मी पूज्य मानले असते का?" प्रश्नाचे सरळ आणि प्रामाणिक उत्तर नाही असे आले. मग निष्कर्ष उघड होता. कोणत्याही मार्गाने या विभूती आणि ग्रंथाविषयी मनातील पूज्य श्रद्धाभाव दूर झाला पाहिजे. आमच्या कंपूतील पूज्य मित्राने युक्ती सुचवली. प्रत्येक वेळी जेव्हा जेव्हा या व्यक्तींची किंवा ग्रंथांची नावे आपण घेऊ तेव्हा नावाच्या आधी एक अपशब्द वापरायचा! या युक्तीचा परिणाम लवकर दिसून आला. थोडक्यात, मनात कोणाला विभूतीस्थान नसावे याकरिता खास मेहनत घेतलेला मी माणूस आहे.
 आदराऐवजी असूया

 माझ्या कोणी विभूती नाहीत; पण अनेक लोकांबद्दल आणि त्यांच्या कामाच्या काही अंगाबद्दल मला भरपूर आदर आहे किंबहुना अशा काही व्यक्तींविषयी माझ्या मनात मत्सराची भावना आहे. डार्विनच्या जागी आपण असतो आणि 'बिगल' बोटीवर निम्म्या जगाचा प्रवास करताना सापडलेल्या एकेक अवशेषाच्या पुराव्याची सांगड जोडता जोडता उत्क्रांतीचा सिद्धांत आपल्याला मांडायला मिळाला असता तर केवढा आनंदा झाला असता. लायोनेल रॉबिन्स किंवा लॉर्ड केन्स यांच्या प्रभुत्वाने, शैलीदार गद्यात, अर्थशास्त्रातील अगदी कूट समस्यांचे हळूवार पायरी पायरीने विश्लेषण करीत करीत प्रचलित समजुती आणि सिद्धांत पार उलथवून टाकण्याचे आपल्याला जमले असते तर, अशा कल्पनांनी माझ्या तोंडाला पाणी सुटले. आर्ट बुखवाल्ड, अमेरिकन व्यंगकार दररोज एक ३०० शब्दांचा लेख नर्म विनोदासह, खुसखुशीत भाषेत, त्या दिवशीच्या ताज्या घटनांच्या संदर्भात आणि अचूक मर्मभेद करणारा असा वर्षानुवर्षे लिहितो आहे. असे आपल्याला काही जमले पाहिजे, अशी असूया मला सतत वाटते. टाईम्स ऑफ इंडिया उघडावा आर.के. लक्ष्मणचे व्यंगचित्र पाहावे आणि त्या दिवशीच्या घडामोडीवर त्यांचे व्यंगचित्र पाहिल्यानंतर, "अरे, हे आपल्याला का नाही सुचले?" असे म्हणून ती अनेकदा स्वत:च्याच थोबाडीत मारून घ्यावी. गाण्यातील काही कळत नसूनही भीमसेनांचे गाणे ऐकताना सगळा रसिकवृंद ज्या तल्लीनतेने डोळ्यात प्राण आणून त्यांच्याकडे बघतो ते पाहिल्यावर

अन्वयार्थ - एक / ३४२