पान:अन्वयार्थ - १ (Anvayarth -1).pdf/337

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

होणार आहे. माओबरोबर बावीस वर्षे सतत राहिलेले डॉ. झीस्वी यांनी खराखुरा माओ सूर्यप्रकाशात आणला आहे.
 माओने केलेल्या आपल्या साथीदारांच्या निघृण हत्यांचा इतिहास सगळ्या जगाला माहीत आहे. 'मोठी छलाँग', 'सांस्कृतिक क्रांती' यांच्या कालखंडात दशलक्षावधींनी माणसे मारण्यात आली. साम्यवादी सत्तेला विरोध करणाऱ्या व्यक्तींना नुसतेच ठार करण्यात आले असे नाही, तर त्यांचे मांस खायला देण्यात आले. येथपर्यंतच्या आसुरी 'दैत्यकथा' आता सर्वदूर माहिती झाल्या आहेत; पण या सर्व भीषण हकिकतींचा संबंध व्यक्तिशः माओशी नव्हता, असणे शक्यच नव्हते, अशा राक्षसी प्रकारांची माओला यत्किंचितही कल्पना असती तर त्याने ते घडू दिलेच नसते, अशी सर्वसाधारण माओभक्तांनी आजपर्यंत, स्वतःची समजूत घालून दिली होती. या समजुतीचा पाया उखडून टाकणारे आणि माओच्या व्यक्तिगत आयुष्यावर प्रकाश टाकणारे हे माओचरित्र अमेरिकेत प्रसिद्ध होत आहे. १९५५ ते १९७६ ही बावीस वर्षे डॉ. झीस्वी माओच्या सतत सान्निध्यात राहिले. पहिली अकरा वर्षे त्यांनी रोजनिशी लिहिली; पण स्वसंरक्षणासाठी ती १९६६ मध्ये जाळून टाकली. माओच्या मृत्यूनंतर सुरुवात केली.
 माओचे वस्त्रहरण
 माओ घाणेरड्या शिव्या देई, दात कधी घासत नसे, अंघोळ क्वचितच करी येथपासून ते माओ त्याला झालेल्या गुप्तरोगावर उपचार करून घेण्यास नकार देई, अधिकाधिक स्त्रियांशी संबंध आल्यामुळे रोग बरे होतील एवढेच नव्हे तर, दीर्घायुष्य लाभेल अशी त्याची खात्री होती. येथपर्यंत बारकाईने तपशील डॉ. ली यांनी दिले आहेत. माओ मोठा संशयी आणि खुनशी स्वभावाचा होता. 'मोठ्या छलांगी'च्या काळात शेतीकडे दुर्लक्ष केल्यामुळे काही कोटी माणसे भुकेने मेली. त्या वेळी माओने काही काळपर्यंत मांसाशन सोडले होते; पण या सगळ्या भूकबळींची जबाबदारी त्याने स्वतः कधी स्वीकारली नाही.

 क्रूरकर्मा सुलतान आपल्या पराक्रमाची पराकोटी जनानखान्यात गाठू इच्छितात. याही बाबतीत एखाद्या चेंगीजखानाचा अपवाद सोडल्यास माओच्या बरोबरीस कोणी सुलतान यायचा नाही. साम्यवादी सत्तेच्या काळात. बेजिंगमधील तालेवार स्त्रिया माओ-त्से-तुंगपासून मिळालेले गुप्तरोग अभिमानाने माओ-निष्ठेचे आणि संबंधांचे मानचिन्ह म्हणून मिरवीत असत आणि अशा संबंधांतून आपल्या दरबारी लोकांवर माओ नजर ठेवीत असे. इ. इ. गोष्टींची अनेक उहारणे डॉ. ली

अन्वयार्थ - एक / ३३८