पान:अन्वयार्थ - १ (Anvayarth -1).pdf/335

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.






साम्यवाद्यांच्या इतिहासातील खलनायक माओ


 टॉलस्टॉयच्या 'युद्ध आणि शांतता' कादंबरीचा प्रतिनायक भावुक व्यक्तिपूजक आहे. नेपोलियन जगातील सर्व बंधनांतून मानवजातीला सोडवणारा विमोचक युगपुरुष आहे असा त्याचा विश्वासच नव्हे दृढश्रद्धा असते. नेपोलियन म्हणजे सर्व जे जे काही दिव्य भव्य त्याची मूर्ती अशा भावनेने त्याची व्यक्तिपूजा करीत असतो. मातृभूमी रशियावर नेपोलियनच्या फौजा चालून आल्यानंतर आसपासच्या सर्व जनांचा रोष पत्करूनही तो आपली भावना कायम ठेवू पाहतो, हळूहळू त्याचा भ्रमनिरास होतो. थोर माणसे ही सगळी नकली बाहुल्यांसारखी असतात, इतिहासाच्या अपघाताने त्यांच्यावर थोरपण लादले जाते याची त्याला हळूहळू जाणीव होऊ लागते. तारुण्याच्या भरात कोणा विचारावर, कल्पनेवर, व्यक्तीवर सारा जीव ओवाळून टाकावा अशा ऊर्मी उसळत असताना नेपोलियनविषयीचा नायकाचा भ्रमनिरास किती कठोर अनुभव होता याचे मोठे सुंदर चित्रण टॉलस्टायने केले आहे.
 साम्यवादाचे चारित्र्यदोष

 हिंदुस्थानातील असंख्य माओ झेडुंगच्या भक्तांची अशीच मोठी दयनीय आणि कठीण अवस्था होणार आहे. मार्क्स, लेनिन, स्टॅलिन यांच्या व्यक्तिगत जीवनावर आतापर्यंत अनेक प्रकाशझोत पडले तर ही सगळी माणसे काही बाबतीत अगदीच शूद्र काही बाबतीत भयानक राक्षसीही होती असे दिसून आले आहे. साम्यवादाचा पाडाव इतिहासात अटळ होता हे 'भाई' लोकही बोलून दाखवू लागले आहेत. रशियन साम्यवादी सत्तेतील हुकूमशहा भयानक क्रूरकर्मा होत हे खरे; पण त्याउलट चिनी साम्यवादी पक्षातील नेतृत्व खरेखुरे उज्ज्वल चारित्र्याचे, धीरोदात्त, त्यागमयी होते, विशेषतः माओ-त्से-तुंग म्हणजे तर तत्त्वज्ञान, विचार, काव्यशक्ती, त्याबरोबरच कर्मठ कृती आणि रणांगणातील

अन्वयार्थ - एक / ३३६