पान:अन्वयार्थ - १ (Anvayarth -1).pdf/330

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.



हुंडा बाजारातील खुल्या अर्थव्यवस्थेचे विदारक स्वरूप


 डॉ. मनमोहनसिंगांची खुली अर्थव्यवस्था प्रत्यक्षात केव्हा अवतरेल कोण जाणे? पण इंग्रज गेल्यानंतर देशात प्रस्थापित झालेली नोकरशाही संपण्याची काही लक्षणे नाहीत. याउलट नोकदारांचे वर्चस्व येथे अनंतकालपर्यंत चालू राहणार आहे, अशी आम जनांची निश्चिती आहे. नियोजन व्यवस्था आणि सरकारशाही यांचे प्रतीक असलेल्या नोकरदारांना खुल्या व्यवस्थेचा नजीकच्या भविष्यकाळात तरी काहीच धोका नाही, अशी खुल्या बाजाराचीच भावना आहे.
 सगळ्या बाजारपेठांत आणि सगळ्याच अर्थव्यवस्थांत सरकारी हस्तक्षेप आहेत, नियंत्रणे आहेत. ती कमीअधिक प्रमाणात पाळली जातात. एका बाजारपेठेत मात्र सरकारी नियंत्रणे कडक असूनही बाजारपेठ अगदी खुली राहिली आहे. लग्नाच्या आणि हुंड्याच्या बाजाराइतका मुक्तबाजार दुसरा कोणताही नाही.
 कोणा माणसाची जाणण्याची एकमात्र फुटपट्टी बाजारातील किंमत! हुंडाविरोधी चळवळी १०० वर्षे तरी चालू आहेत. हुंडा प्रतिबंधक कायदा होऊन कित्येक वर्षे लोटली, तरीही असल्या निर्बंधांना आणि दडपणांना बगल देऊन हुंडाबाजार तेजीत चालू आहे. मागणी आणि पुरवठा यांच्या तालावर बाजारातील व्यवहार अखंड चालू आहेत.

 माझा एक जवळचा सहकारी कला शाखेतील पदवीधर, शिक्षण संपल्यावर गावाकडे परत येऊन शेती बघू लागला; पण त्याला एकही मुलगी सांगून येईना. तेव्हा निरुपाय म्हणून त्याने जवळच्या शहरात शिक्षकाची नोकरी मिळविली; मग त्याच्या स्थळावर वधूपित्यांच्या उड्या पडल्या. लग्न झाल्यावर वर्षा दोनवर्षांनी नोकरी सोडून देऊन तो पुन्हा शेतकीकडे गावी परत आला. ५० वर्षांपूर्वी परिस्थिती अशी नव्हती. जमीनजुमला, खानदान पाहून मुलगी दिली जात असे. केवळ नोकरी असणाऱ्या उपवधू तरुणांना फारशी किमत नसे. आता

अन्वयार्थ - एक / ३३१