पान:अन्वयार्थ - १ (Anvayarth -1).pdf/327

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

नये, लोक ते आपोआपच करतील," असे मत मांडणारेही होते.
 बिजिंगची रंगीत तालीम
 स्त्रीस्वातंत्र्यवाद्यांचा तर मोठा जमाव कैरोत जमला होता. पुढच्या वर्षी सप्टेंबर १९९५ मध्ये बिजिंग येथे महिला प्रश्नावर परिषद होणार आहे. कैरो येथे जणू त्याची रंगीत तालीम चालली आहे, अशा तयारीने स्त्रीमुक्तिवादी स्त्रीपुरुष जमले होते. वयात येऊ लागतातच मुला-मुलींना लैंगिक शिक्षण मिळावे, कुटुंब नियोजनाची साधने मुबलक आणि सहजपणे उपलब्ध व्हावीत, गर्भपात 'ब्युटीपार्लर'मध्ये गेल्याप्रकरणासारखा सहज शक्य व्हावा, अशा तोंडवळ्याचा त्यांचा कार्यक्रम.
 त्याच्या विरोधात रोमन कॅथालिक राष्ट्र. लोकसंख्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी दोन मुलांमधील अंतर वाढवणे अशा मार्गांना त्यांचा पाठिंबा आहे; पण गर्भनिरोध, गर्भपात, मुला-मुलींना लैंगिक शिक्षण असल्या कार्यक्रमांना त्यांचा कडवा विरोध. रोमन कॅथालिक गटास अनपेक्षितरीत्या मदत मिळाली ती मुस्लिम कठमुल्ला राष्ट्रांची. इस्लामी समाजातील स्त्रियांचे पारंपरिक स्थान आणि भूमिका बदलू पाहणाऱ्या कोणत्याही कार्यक्रमाला त्यांचा विरोध (काही मुस्लिम राष्ट्रांचा विरोध) इतका कडवा, की त्यांनी परिषदेवरच बहिष्कार घातला. बेनजीर भुत्तो यांना परिषदेवर राहणेही दुष्कर झाले होते; पण त्या हजर राहिल्या. 'एक मुलगी, एक पत्नी आणि एक माता' म्हणून आपण बोलत असल्याचे त्यांनी पहिल्या वाक्यात सांगितले; पण नंतरची मांडणी सारी कठमुल्लांची आणि कहर म्हणजे त्यांनी काश्मीर प्रश्नही उठविण्याचा प्रयत्न केला. परिषदेस हजर राहिल्याबद्दल देशात होणारा क्षोभ शमविण्याची त्यांची धडपड घडत होती.
 गर्भपात हा चर्चेचा मोठा विषय झाला. व्हॅटिकन आणि मुस्लिम राष्ट्रे दोघांनीही गर्भपाताला कडवा विरोध केला; पण गेल्या दोन वर्षांत क्लिंटन सरकारचे गर्भपातविषयक धोरण बदलले आहे. गर्भपाताच्या साधनाचा उपयोग क्वचितच व्हावा; पण करण्याची वेळ आली तर तो सुरक्षित आणि कायदेशीर असला पाहिजे अशी क्लिंटन सरकारची भूमिका आहे.
 विकासातून कुटुंबकल्याण?

 साऱ्या जगाचा इतिहास दाखवितो, की गरीब समाजात जन्माचे प्रमाण अधिक असते. संपन्नता आली, चांगले जगण्याची चव कळली, बायका 'चूल आणि मूल' या चक्रातून बाहेर पडू लागल्या, की लोकसंख्या-वाढ मंदावते; पण हा निष्कर्ष सर्वांना मान्य असला तरी कैरोत जमलेल्या कोणालाही परवडण्यासारखा

अन्वयार्थ - एक / ३२८