पान:अन्वयार्थ - १ (Anvayarth -1).pdf/326

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

हुज्जत जगभर विनोदाचा विषय झाली आहे.
 लोकसंख्या परिषद
 अशा याच कैरो नगरीत असाच एक गालिच्यांचा बाजार नुकताच भरला होता. संयुक्त राष्ट्रसंघाच्या झेंड्याखाली 'जागतिक लोकसंख्या आणि विकास परिषद' भरली होती. त्यानिमित्ताने लोकसंख्येची वाढ या विषयावर भिन्नभिन्न, अगदी उलट टोकाची मते असलेले व्यापारी आपापल्या वाणांच्या गालिच्यांचे ढीग घेऊन आले होते. दीडशेवर राष्ट्रे वाण पसंद करण्यासाठी आली होती. मोठा बाजार भरला, खूप गाजला, डोक्याला मुंग्या येईपर्यंत हुज्जत घातली; व्यापारी पांगले; ग्राहके पांगली; खरीदलेल्या गालिच्याचा वाण आणि दिलेली किंमत याबद्दल आज सर्वांना समाधान वाटते आहे. घेतलेले वाण खरोखर काय लायकीचे आहे, गालिचा आहे, की गोधडी हे समजायला कित्येक वर्षे लागतील.
 लोकसंख्या वाढते आहे, प्रचंड वेगाने वाढते आहे, दरवर्षी नऊ कोटींनी वाढते आहे हा सर्वांच्या चिंतेचा विषय आहे. लोकसंख्यावाढीची गती कमी केली नाही तर गरीब राष्ट्रे सुधारणार नाहीत. धरणीवरील माणसांची संख्या अशीच वाढत राहिली तर पृथ्वी हा भार पेलू शकणार नाही. थोडक्यात पृथ्वी म्हणजे फळ आहे, असे मानले तर माणूस ही त्याला लागलेली कीड आहे. किड्यांनी आपली प्रजोत्पादनाची गती कमी केली, संख्या मर्यादित ठेवली तर या फळावर त्यांची गुजराण अधिक चांगली होईल आणि अधिक काळ चालेल अशी सर्वसाधारण मान्यता आहे; पण हा प्रश्न हाताळावा कसा यावर एकमत नाही.
 मतामतांचा गलबला

 कैरोला जमलेल्या गालिच्यांच्या व्यापाऱ्यांच्या गलबल्यात अनेक सूर होते. गरीब देशांचे प्रतिनिधी नेहमीप्रमाणे निधीच्या शोधात होते. "लोकसंख्येचा कार्यक्रम विकास कार्यक्रमाचे एक अंग आहे. श्रीमंत देशांनी विकासासाठीही अधिक मदत करावी आणि लोकसंख्या आटोक्यात आणण्यासाठी त्यांनीच मदत करावी." अशी विनवणी करीत राजदूती भिक्षापात्रे घेऊन ते उभे आहेत.
 "लोकसंख्या वाढली तर त्यात वाईट काहीच नाही. प्रत्येक तोंडाबरोबर दोन हात जन्माला येतात. संख्या वाढली, की स्पर्धा वाढते. त्यामुळे माणसांची गुणवत्ता वाढेल. पोषणाचे-प्रगतीचे नवनवे आयाम माणूस शोधून काढेल." असा आग्रह धरणारेही होते.
 "लोकसंख्या, कुटुंबव्यवस्था हे विषय खासगी आहेत. सरकारने त्यात ढवळाढवळ करू नये, कोणतेही मत किंवा पद्धती लादण्याचा प्रयत्न करू

अन्वयार्थ - एक / ३२७