पान:अन्वयार्थ - १ (Anvayarth -1).pdf/322

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

गोळ्यांनी चाळण होऊ लागली, तरी मारेकऱ्यांच्या शोधाचा पत्ता म्हणून नाही.
 विमानातील हवाई सुंदरीशी चाळे करणारे उपमुख्यमंत्री बनले, गावगन्ना पुढारी सत्ता आणि संपत्ती यांच्या ढिगावर बसले. त्यांची पोरे आणि तरणीबांड नातवंडे बापजाद्यांच्या हरामाच्या कमाईवर शेकड्यांनी आसपासच्या मायबहिणींची अब्रू लुटू लागले. मोगलाईच्या काळापेक्षाही महाराष्ट्राची अवस्था कठीण झाली; पण कोठेही आशेला अंकुर फोडणारी डफावरची थाप ऐकू येत नाही. एक अमर शेख असता, एक अण्णाभाऊ साठे असते तर सत्ताधीशांच्या साऱ्या ढोंगाचा बुरखा त्यांनी टराटरा फाडून टाकला असता. शाहिरांच्या आवाजाची धार अशी, की "तुम्ही म्हणता त्याला पुरावा काय ते सांगा.' अशी कोल्हेकुई करण्याची हिंमत नेत्यांच्या चमच्यांना होऊच शकली नसती. एकएका नेत्यांच्या वाढत्या इस्टेटींचे हिशेब शाहिरांनी मांडले असते. पप्पू आणि ठाकुर यांच्याशी सलगी करून, ती नाकारण्याच्या विश्वामित्री पवित्र्याची त्यांनी हुर्रेवाडी केली असती. मनोमीलन आणि संस्कृतीच्या नावाखाली दिल्ली दरबारात कुर्निसात घालणाऱ्यांची भंबेरी उडवली असती.
 हे 'मऱ्हाटे' शाहीर गेले कुठे? महाराष्ट्रावर संकट आलेले आणि सगळे शाहीर झोपलेले कसे? माय मराठीची कुस इतकी वांझ निघाली, की या पिढीत कोणी काही शाहीर जन्मलाच नाही काय? तसे म्हणावे तर प्रत्येक मराठी सिनेमात दर अर्ध्या तासाने उत्तान लावण्यांच्या चौकटीत आकडेबाज मिशा आणि भरदार छातीचे उंचेपुरे शाहीर उभे ठाकलेले दिसतात. सर्व शाहिरांची मिळून एक मोठी अखिल महाराष्ट्र संस्था आहे असे कधीतरी वर्तमानपत्रात वाचले आणि दूरदर्शनवर पाहिले. रंगांच्या पंचम्या खेळणारे नवे पेशवे त्या संस्थेत जाऊन कोणा शाहिराला 'महाराष्ट्र भूषण', कोणाला शाहीर-शिरोमणी असे शिरपेच चढवताना पाहिले. म्हणजे शाहिरांची जात काही संपली असे नाही, महाराष्ट्रभूमी अजूनही शाहिरांना जन्म देते आहे!
 कवनांचे कारखाने

 पण हे सगळे शाहीर महाराष्ट्राच्या संकटासंबंधी कवने रचण्यास मोकळे नाहीत. सगळे कामात गर्क आहेत. कवनांच्या मागण्यांचेच त्यांच्यापुढे ढीग पडले आहेत. सिनेमासाठी पोवाडे पुरवायचे आहेत, दूरदर्शनसाठी दलितोद्धाराचा अख्खा कार्यक्रम द्यायचा आहे, साक्षरता प्रसाराचे महत्त्व सांगणारी कवने मागणीनुसार पाडण्यात ते गर्क आहेत, कुटुंब नियोजनाच्या कवनात थोडा पांचटपणा दाखवला, की गावोगावचे आंबटशौकी लट्टू होऊन जात आहेत.

अन्वयार्थ - एक / ३२३