पान:अन्वयार्थ - १ (Anvayarth -1).pdf/321

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 शंकरराव देव यांच्याकडे आंदोलनाचे नेतृत्व चालून आले. त्याबरोबरच आपण कोणी दुसरे महात्मा गांधीच बनलो आहोत, असा आव आणून त्यांनी उपोषणबाजी मांडली. लोकांच्या मनात संताप संताप झाला. शाहिरांच्या कवनांनी भोंदूपणाचा पंचा क्षणार्धात फेडून टाकला. काकासाहेब गाडगीळ हा दुसरा नमुना. सत्तेचा मोह तर सुटत नाही आणि महाराष्ट्रात तर शौर्याच्या, मुर्दमकीच्या, त्यागाच्या बाता मारण्याची हौस फिटत नाही. यशवंतराव चव्हाणांपासून मामा देवगिरीकरांपर्यंत यच्चयावत पुढाऱ्यांची एका शाहिरी गोंधळाने भंबेरी उडवून टाकली.
 'संयुक्त महाराष्ट्र सूर्य उगवतोय सरकारा!
 खुशाल कोंबडं झाकून धरा'
 या एका ललकारीने दिल्लीच्या नेहरूंपासून फलटणच्या राजवाड्यात कारस्थाने करणाऱ्या यशवंतराव चव्हाण, मालोजीराव निंबाळकर यांना पळता भुई थोडी करून टाकली. देवीच्या गोंधळाला निमंत्रण घालताना शाहिरांनी नुसते एक एक नाव घ्यावे.
 यश चव्हाणा! गोंधळा ये!!
 काका गाडगीळा! ये गोंधळा ये!!
 एक एक नावाच्या उद्धारानिशी मोठमोठी धेंडे धुळीस मिळावीत आणि लाखालाखांनी फुलून गेलेल्या गावोगावच्या मैदानात विजयाच्या खात्रीची लाट विजेच्या लहरीसारखी सर्वांना भेटून जावी. दिल्लीला महाराष्ट्राचे आंदोलन जाऊन भिडले आणि तेथील राजरस्त्यावर
 'जागा मराठा आम जमाना बदलेगा,
 उठा जो तुठान तो आखिर बंबई लेकर थम लेगा!'
 या अमर शेखांच्या पहाडी ललकारीने साऱ्या दिल्लीकरांची संयुक्त महाराष्ट्राच्या विजयाची खात्री पटवली होती.
 सारे शाहीर गेले कोठे?

 द्वैभाषिकाची घोषणा नेहरूंनी केली आणि मुंबई स्वतंत्र ठेवली. त्यावेळचे संकट काहीच नाही अशा दुर्धर अवस्थेत सारा महाराष्ट्र आज सापडला आहे. महाराष्ट्राच्या नेत्यांचे जाहिरातीच्या दराने वर्तमानपत्रांनी गुणगान होत आहे. "असा नेता झाला नाही. आमच्या नेत्याविरुद्ध कोणी शब्द काढाल तर खबरदार!" अशा डरकाळ्या ऐकू येत आहेत. गुंडांच्या एका सम्राटाने महाराष्ट्राचे नाक मुंबई आपल्या टाचेखाली आणले आणि दिवसाढवळ्या भल्याभल्यांची बंदुकांच्या

अन्वयार्थ - एक / ३२२