पान:अन्वयार्थ - १ (Anvayarth -1).pdf/323

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

संकरित वाणांचे बियाणे, सहकाराचे महत्त्व आणि युरिया-फॉस्फेटच्या वापराचे फायदे, सामाजिक वनीकरणाने समाजाचे फायदे, यासंबंधीच्या काव्याची मागणी तर इतकी भरमसाट, की त्याकडे लक्ष द्यायला स्वतः शाहिरांना फुरसतही नाही. ती पाडण्याचे काम असिस्टंट सब ज्युनिअर शाहिरांकडे सोडून द्यावे लागत आहे. पैशाच्या हिशेबात बोलायचे तर महाराष्ट्रात शाहिरांची आज जितकी चंगळ आहे तितकी साऱ्या इतिहासात कधी नव्हती.
 सगळे शाहीर सरकारी तबेल्यात

 एक तरुण शाहीर भेटले, चांगले शास्त्र विषयाचे पदवीधर झालेले. वाचन बऱ्यापैकी असलेले. शब्दांची लय, ताल, ठेका त्यांच्या गद्य बोलण्यातही जाणवावा इतका स्पष्ट. त्यांच्यापुढे आजच्या महाराष्ट्र शाहिरांच्या वांझपणाबद्दलची व्यथा मी मांडली. ते म्हणाले, "शाहिरी संपली आहे असे मानू नका. आमच्या काव्याला अजूनही धार आहे. माझ्या हातातली कामे संपली, की स्वतःच महाराष्ट्रातील भ्रष्टाचार या विषयावर एक पुरा कार्यक्रम बसवणार आहे. अडचण अशी, की आम्ही पहिला डफ वाजवला, थोडे नाव झाले आणि एकदम नेत्यांचेच मोठे पत्र आले. प्रतिभेची, काव्यशक्तीची भरपूर स्तुती, ही शक्ती देशाच्या विकासाच्या कामाला लागो अशी अपेक्षा व्यक्त केलेली. रेडिओ, दूरदर्शन आणि सरकारी माध्यमे यांच्याकडून प्रकाशाच्या झोतात उभे राहण्याची संधी आणि वर संध्याकाळच्या भाकरी-चटणीची भ्रांत असताना मोठ्या नोटांचा करकरीत आवाज. धन्य धन्य वाटले. सार्थक झाले असे वाटले. नेत्यांच्या चालचलणुकीची सारी कीर्ती कानात होती, सगळी प्रतिभा त्यांना उलथवण्याकरिता कामी लावली पाहिजे अशी ऊर्मीही होती; पण आम्ही तुकाराम थोडेच आहोत, की शिवाजी महाराजांनी पाठवलेला नजराणा नाकारून परत पाठवावा! आम्ही तर पातशहांच्या नजराण्यांच्या मोहातून न सुटणारे. मनाशी समजूत घातली... लोक एवढ्या मतांनी यांना निवडून देतात, जयजयकार करतात. देशाचे आशास्थान म्हणतात. मणामणाचे हारतुरे चढवतात. सारे खुळेच काय? मग त्यांची सेवा करायला काय हरकत आहे! अशी टोचणाऱ्या मनाची शांतता सहज करता आली, भाकरीची सोय झाली आणि खोटं कशाला बोलू? कोंबडीची आणि बाटलीचीही सवय पडली. आता नेत्यांविरुद्ध आणि त्यांच्या चेल्यांविरुद्ध हात वळत नाही आणि जीभही उठत नाही बघा! उलट ज्या मिळेल त्या निमित्ताने त्यांची तोंड ठाटेपर्यंत अफाट स्तुती करतो बघा. भाट बनलो हो भाट! भाट तरी बरे! पुरे खुषमस्करे विदूषक बनलो बघा!" शाहीर कळवळून म्हणाले.

अन्वयार्थ - एक / ३२४