पान:अन्वयार्थ - १ (Anvayarth -1).pdf/319

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

मनमानी चालवण्याकरिता या तरतुदीचा उपयोग झाला आणि आज ३१व्या कलमाशी कोणत्याही तऱ्हेने संबंध नसलेल्या प्रकरणी म्हणजे सरकारी नोकरीतील जागा राखीव ठेवण्याच्या संबंधात या जुलमी तरतुदीचा उपयोग केला जात आहे.
 रावांच्या घरची उलटीच चाल
 आर्थिक सुधार खुलीकरण यांचे नवे युग प्रत्येक्षात आणताना नरसिंह राव आणि मनमोहनसिंग यांनी खासगी मालमत्तेचा हक्क पुन्हा प्रस्थापित करण्यास प्राधान्य देणे आवश्यक होते. खासगी मालमत्ता नसली तरी खुला बाजार कसला आणि खुली अर्थव्यवस्था कसली! त्यासाठी नेहरू आणि इंदिरा गांधी यांनी मालमत्तेच्या मुलभूत हक्कांवर आघात करणाऱ्या ज्या ज्या दुरुस्त्या केल्या त्या सर्व रद्दबातल करावयास हव्या होत्या. घटनेतील ३१(अ) आणि (ब) ही कलमे आणि त्याबरोबर नववी अनुसूची समूळ नष्ठ करावयास पाहिजे होती.
 प्रत्येक्षात उलटेच घडते आहे. नववी अनुसूची अधिक मजबूत करण्यात येत आहे. या विक्राळ चिलखताचे संरक्षण मंडल कार्यक्रमाच्या नव्या अतिरेकी अवतारास दिले जात आहे. नववी अनुसूची शेतकऱ्यांना खाऊन गेली, मालमत्तेच्या हक्काला खाऊन गेली, प्रामाणिक उद्योजकांना खाऊन गेली. आता तिने जबडा अधिक पसरला आहे. त्या कोणाकोणाचे बळी जातात ते उघड्या डोळ्यांनी पाहायचे फक्त राहिले आहे.

(१६ सप्टेंबर १९९४)
■ ■

अन्वयार्थ - एक / ३२०