पान:अन्वयार्थ - १ (Anvayarth -1).pdf/30

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

तो गहू अगदी स्वस्त भावात म्हणजे फक्त वाहतूक खर्चावर पुरवायला तयार आहे, हे पाहिल्यावर अशोक मेहता उद्गारले, "अन्नधान्याचा पुरवठा इतका सुलभ असेल तर भारतीय शेतीकडे दुर्लक्ष करायला हरकत नाही."
 हिर्शमन नावाचे एक नामवंत अर्थशास्त्रज्ञ भारतातील नियोजनाविषयी सल्ला द्यायला आले होते. साहेबांचा सिद्धांत असा, की सगळ्या देशाचा सर्वांगीण विकास एकसाथ होत नाही. उंट जसा अंगाअंगाने उठतो त्याप्रमाणे देशाच्या विकासाचे आहे. काही अंगांना प्राधान्य देऊन उठवले पाहिजे. बाकीच्या शरीराकडे दुर्लक्ष झाले तरी चालेल. तात्पर्य, कारखानदारी उठवा आणि शेतीकडे दुर्लक्ष करा. या असल्या मसलतींनी भारतीय अर्थव्यवस्थेची भयानक शोकांतिका झाली नसती तर त्यांना पाचकळ विनोद म्हणून बाजूस टाकता आले असते.
 उंटावरचे शहाणे
 या साहेबांचा आणि त्यांच्या भारतीय शिष्यांचा आणखी एक जावईशोध, शेतकरी किती पिकवतो? त्याच्याकडील साधनाने जास्ती जास्त जितके पिकवता येणे शक्य आहे तितके पिकवतो. पीक काढण्यातील कष्टातून दोन पैसे सुटतील किंवा नाही हा मुद्दा शेतकऱ्यांच्या बाबतीत गौण आहे. प्रोत्साहन द्यायचे असेल तर ते कारखानदारांना द्या, शेतकऱ्यांना नको. शेतकरी विचार करणारा, सुख दुःखे जाणणारा माणूस आहे. हे अर्थशास्त्रांच्या गावीही नाही.
 डॉ. दांतवाला हे असेच एक मान्यवर अर्थशास्त्रज्ञ. कृषी मूल्य आयोग, नियोजन मंडळ अशा महत्त्वाच्या जागी काम केलेले. यांचे म्हणणे असे, की शेतीमालाचा उत्पादनखर्च काढताना शेतकऱ्याच्या घरची माणसे शेतात राबतात, त्यांची मजुरी धरण्याचे काही कारण नाही. कारण, काय? स्वतःच्या शेतावरती काम केले नसते तर या कुटुंबीयांना काही दुसरीकडे कोठे रोजगार मिळणार होता असे नाही, त्यांचा वेळ फुकटच जाणार होता. स्वतःच्या शेतावर त्यांनी काम केले, त्याचा वेगळा खर्च मोजण्याचे काय कारण? दांतवाला साहेब एवढ्यावरच थांबले नाहीत, पुढे जाऊन मल्लिनाथी करते झाले, "शेतकऱ्यांची सीमांत उत्पादकता नकारात्मक आहे, त्यामुळे घरच्या मंडळींचे कष्ट मोजायचे झाले तर त्यांचा रोज शून्यापेक्षा कमीच धरावा लागेल." आणि सर्व अर्थशास्त्रज्ञांनी 'वाहवा, वाहवा' केली. या जडजंबाल विद्वद्वचनांचा अर्थ असा, की शेतकरी शेतात काम करतो आणि शेतीत नुकसान होते. शेतकऱ्याला जगण्याकरिता जो खर्च येतो तोसुद्धा शेतीत निघत नाही; मग त्याच्या कष्टाची किमत ती काय धरायची?

अन्वयार्थ - एक / ३१