पान:अन्वयार्थ - १ (Anvayarth -1).pdf/29

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.





नवे कलुषा कब्जी


 प्रत्येक संभाजीचा एक कलुषा असतो; प्रत्येक बाजीरावाचा घाशीराम कोतवाल. खोलात पाय जाणाऱ्या प्रत्येक 'झार' बादशहाचा एक रासपुतीन असतो. स्वातंत्र्यानंतरच्या ऱ्हासाच्या काळाचे कलुषा कब्जी म्हणजे भारतीय अर्थशास्त्री.
 पिंडीवरील विंचू
 अर्थशास्त्र हे भौतिकशास्त्राच्या तुलनेत काही फारसे प्रगत शास्त्र नाही. नोबेल पुरस्काराचा मान या शास्त्राला अगदी अलीकडे देण्यात आला. या सन्मानास पात्र ठरलेले संशोधन सगळेच्या सगळे पाश्चिमात्य देशांत आणि खरे सांगायचे म्हणजे अमेरिकेतील दोन तीन विद्यापीठांतच झाले आहे. भारतासारख्या गरीब देशात अर्थकारण आणि विकास यांच्याविषयी काम जवळजवळ शून्यच आहे आणि तरीदेखील, कोण कुठचा कब्जी कलुषा एकदम संभाजीच्या बेबंदशाहीत सर्वाधिकारी झाला, तसेच अर्थशास्त्री मंडळी देशात एकदम महत्त्वाच्या पदी चढली.
 या आधुनिक कलुषांनी देशातील गरिबी दूर करण्याविषयी गेल्या चाळीस वर्षांत जे काही सल्ले दिले ते आठवले तरी आज पोटात गोळा उठतो. विद्यापीठातील अभ्यासक्रमातील पुस्तकांशी चुटपूट ओळख, इंग्रजी भाषा आणि थोडेफार गणित एवढीच काय ती त्यांची पुंजी. शेतीतल्या काबाडकष्टांची त्यांना जाणीवही नाही. एखादी पानपट्टीची गादी चालवण्याइतकाही व्यापाराचा अनुभव नाही, मग छोटी मोठी कारखानदारी चालवणे दूरच. नेहरू नियोजनव्यवस्थेत शंकराच्या पिंडीवर हे विंचू चढले आणि आपला प्रताप दाखवू लागले.
 चेष्टा वंदू मग किती?
 समाजवादी पक्षाचे संस्थापक नेते, नियोजन मंडळाचे माजी उपाध्यक्ष अशोक मेहता अमेरिकेत गेले. तेथे गहू मुबलक उपलब्ध आहे आणि अमेरिकन सरकार

अन्वयार्थ - एक / ३०