पान:अन्वयार्थ - १ (Anvayarth -1).pdf/298

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

शेजारच्या देशात निघून चला. जे हुतू रुआंडात राहतील ते जमातीचे शत्रू मानले जातील आणि त्यांचा आम्ही सूड उगविल्याशिवाय राहणार नाही!" असा प्रचाराचा धोशा सुरू झाला.
 लक्षावधींच्या संख्येने हुतू झाईर देशातील गोमा शहराकडे धावले. मधला सारा प्रदेश ज्वालामुखींच्या डोंगरांचा. पायवाटातून कुंभमेळ्याला लोक जमावे इतके निर्वासित जमले. पिण्याच्या पाण्याचीदेखील सोय नाही, स्वच्छतेचे नावच नको. एका दिवशी सकाळी कॉलऱ्याची पहिली लागण आढळली; त्यानंतरच्या २४ तासांत ८ हजार माणसे कॉलऱ्याने दगावली, गोमाच्या आसपास रोगराईने, भूकमारीने, जखमांनी मेलेल्यांची संख्या १० लाखांपर्यंत सहज गेली असेल. आंतराष्ट्रीय संस्था आणि राष्ट्रसंघ यांच्याही ताकदीबाहेरची ही समस्या आहे. लोकांनी परत आपापल्या गावी जावे याखेरीज काही पर्याय नाही; पण या निर्वासितांत सुरुवातीला तुत्सींची अमानुष कत्तल केलेले हुतू सैनिकही आहेत. परत जाऊ इच्छिणाऱ्या हुतू निर्वासितांना त्यांची धाकदटावणी चालू आहे. गोमातून फारतर १० टक्के निर्वासित परत घरी जातील; बाकी सगळे गोमांतच मरून जातील. एका जागी प्रचंड संख्येने माणसे मरून पडण्याचा जागतिक उच्चांक गोमात होणार आहे. एवढ्याने रुआंडीय दुर्भाग्य संपलेले नाही. चारशे वर्षांचा ऐतिहासिक सूड उगविण्याची भाषा करत हुतू नेते पुन्हा एकदा रुआंडावर चालून जाऊन तुत्सींचे शिरकाण करण्याची तयारी करीत आहेत.
 गेल्या वर्षी सोमालियात कराल दुष्काळ पडला. सरकारी धोरणानुसार पडला; एवढेच नव्हे तर बाहेरच्या देशांतून अन्नधान्य मोठ्या प्रमाणावर येऊ लागले तसे सोमालियातील राज्यकर्त्यांनी शस्त्रास्त्रांचा वापर करून ती मदत रोखली. मदत देण्याबरोबर मदतीचे वाटप करण्याची जबाबदारीदेखील संयुक्त राष्ट्रसंघास घ्यावी लागली. इतक्या निकराचा हल्ला स्थानिक सरकारने केला, की अमेरिकेने आपल्या फौजा काढून घेतल्या.
 नव्या पेशव्यांचा अस्त

 संयुक्त राष्ट्रसंघाच्या फौजा आज वेगवेगळ्या सतरा देशांत उपस्थित आहेत. त्यांचा खर्च दरवर्षी १२०० कोटी रुपयांचा आहे. आजपर्यंत या शांती फौजांवर हल्ले होत नव्हते, आता शांतिसैनिकांचे मृत्यू ही रोजची गोष्ट झाली आहे. संयुक्त राष्ट्रसंघाच्या नव्हे जगाच्या इतिहासात काही

अन्वयार्थ - एक । २९९