पान:अन्वयार्थ - १ (Anvayarth -1).pdf/299

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

नवीन घडते आहे. देशातील अंतर्गत यादवी किंवा शेजारी देशातील याचा अनुभव काही नवा नाही; पण आता अराजकाचा एक नवाच प्रकार समोर येत आहे. हैतीत सरकारच नाही; रुआंडातही तीच स्थिती; सोमालियातही तीच अवस्था. दुसऱ्या महायुद्धानंतर जन्माला आलेल्या अनेक टिनपाट राष्ट्रात लष्करी सामर्थ्याच्या आधाराने सरकारे उभी होती. देशातील नागरिकांत एकमयता जवळजवळ नाही. कुठे टोळक्यांचे विद्वेष, कोठे धर्मांतील भांडणे, कोठे जातिसंघर्ष. साम्राज्यवाद्यांनी आपल्या प्रशासनाच्या सोयीसाठी भूगोलाच्या नकाशावर अपघाताने सरहद्दीच्या रेघा ओढल्या म्हणून त्यांना देशाचे रूप आले. साम्राज्यांचे अंत होताना हे प्रशासन विभाग वेगवेगळी राष्ट्रे बनली; आपापला झेंडा फडकवू लागली, राष्ट्रगीत गाऊ लागली. राजकीय सत्ता ज्या टोळीच्या, जातींच्या, धर्माच्या, समाजाच्या हाती लागली त्यांनी ती सत्ता अधिकाधिक व्यापक आणि बलदंड करून टाकली आणि आपल्या टोळीचे वर्चस्व भरकस बसवले. समाजवादाचा पाडाव झाला आणि बाजारपेठेच्या व्यवस्थेकडे मार्गक्रमणा करणे आवश्यक झाले तसे या टिनपाट सत्तांची सद्दी संपली. देशाच्या प्रत्येक क्षेत्रात; प्रत्येक अंगावर निरंकुश सत्ता असले तरच ही सरकारे टिकू शकत होती. आता ती कोसळू लागली आहेत. एकामागोमाग एका देशात निर्नायकी अराजक तयार होत आहे. त्यातून लक्षावधींचे बळी जात आहेत.
 नासलेल्या दुधावरच्या साया
 हैती, रुआंडा, सोमालिया येथील भयानक बातम्या आणि दृश्य पाहताना हे काही वेगळेच जग आहे. हे निग्रो म्हणजे निव्वळ रानटी! हिंदुस्थानात अशी गोष्ट कालत्रयी शक्य नाही, असा दिलासा आपण स्वतःलाच देतो. प्रत्यक्षात रुआंडा आणि हिंदुस्थान यात अंतर फक्त कालाचे आहे, गुणवत्तेचे नाही. इंग्रजांनी सत्ता हाती दिली, ती एका टोळीने आपल्या मलिद्याकरिता वापरली. येथेही वेगवेगळ्या टोळ्या थैमान घालीत आहेत. मंडलवादी, कमंडलवादी, मशीदवादी. कोणी ६०० वर्षांच्या इतिहासाच्या सूडाची भाषा बोलतो, कोणी ६००० वर्षांची.

 स्वातंत्र्यानंतर एका टोळीने सारी सत्ता हाती घेऊन इतर टोळ्यांना लुटले, त्याला प्रत्युत्तर म्हणून आता मंडल, कमंडल झेंड्याखाली नवीन टोळीवादाच्या ललकाऱ्या दिल्या जात आहेत. टोळीवादाला देशात मान्यता मिळत आहे, प्रतिष्ठा मिळत आहे. टोळीटोळीतील विद्वेषाची आग

अन्वयार्थ - एक / ३००