पान:अन्वयार्थ - १ (Anvayarth -1).pdf/297

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

त्यापाठोपाठ या टिनपाट समाजवादी जहागिऱ्या आणि वतनदाऱ्याही कोसळू लागल्या आहेत.
 हवालदिल हैती
 संयुक्त राष्ट्रसंघाच्या विनंतीला मान देऊन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन यांनी हैतीमध्ये फौजा पाठविण्याचा निर्णय आज सकाळीच जाहीर केला. काही पर्याय राहिलेलाच नव्हता. पपा डुर्वालेयेच्या काळापासून पिसाट विदुषकी हुकूमशहांच्या राजवटीखाली हा छोटासा देश भरडला गेला. शेवटी एकदाच्या तेथे निवडणुका झाल्या; पण सनदशीर मार्गाने निवडून आलेले सरकार उलथवून टाकून काही स्थानिक दांडग्यांनी देश हाती घेतला आणि लोकांना असे काही 'दे माय धरणी ठाय' करून सोडले. दररोज हजारोंच्या संख्येने हैती नागरिक होडगी, मचवे, तराफे, बोटी जे काही साधन मिळेल ते घेऊन देशाचा किनारा सोडून अमेरिकेचा आश्रय घेत आहेत. समुद्रात बुडण्याचा धोका परवडला; पण मायदेशी राहणे नको अशा 'त्राही, भगवान!' अवस्थेतील नागरिकांना आसरा देण्यासाठी दुसरा कोणी देश तयारही नाही. अशा परिस्थितीत हैतीवर सरळ चाल करून जाऊन तेथील शासन ताब्यात घेण्याचा निर्णय संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा समितीने घेतला.
 रुआंडातील भीषण रक्तपात

 आठच दिवसांपूर्वी रुआंडामध्येही अमेरिकेन सैनिक उतरले. लढाईकरिता नाही तर लक्षावधींच्या संख्येने निर्वासित झालेल्या आणि कॉलऱ्यासारख्या साथीच्या रोगाने पटापट प्राण सोडणाऱ्या नागरिकांच्या मदतीसाठी. रुआंडा एवढासा छोटा देश. त्यात दोन प्रमुख जमाती किंवा टोळ्या; 'हुतू' आणि 'तुत्सी' शतकानुशतकांच्या दोन टोळ्यांतील विद्वेषावर रुआंडाचे अध्यक्ष हुब्यारिमान यांचा विमान अपघातात मृत्यू झाल्याची ठिणगी पडली आणि हुतूंच्या प्रभावाखालील शासनाच्या अधिकृत सैन्याने तुत्सींची देशभर कत्तल सुरू केली. कत्तलीत ठार झालेल्यांची संख्या २ ते ३ लाख असावी. तुत्सी जमातीने प्रतिहल्ला सुरू केला. पाडाव होऊ लागला तसे हुतूंचे नेते देशाबाहेरील फ्रान्सच्या मदतीने तयार केलेल्या सुरक्षित तटबंदीत आश्रय घेऊन राहिले आणि तेथून त्यांनी आपल्या जमातीच्या लोकांतच घबराट पसरवून देण्याला सुरुवात केली. "तुत्सू आता सूड घेतल्याखेरीज राहणार नाहीत. रुआंडा देश आता आपल्या जमातीला सुरक्षित राहिला नाही.

अन्वयार्थ - एक । २९८