पान:अन्वयार्थ - १ (Anvayarth -1).pdf/292

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

प्रतिसाद दिला नाही तर फेरविचार करावा; पण शस्त्रकपातीला सुरुवात झाली पाहिजे असा त्यांचा आग्रह आहे.
 शांतिदूतांचे घोषपाठ
 सम्राट अशोकांच्या काळापासून युद्धातील प्राणहानीने रक्तपाताने आणि जखमींच्या आर्त किंकाळ्यांनी अनेकांची मने द्रवली आहेत. गौतम बुद्धापासून महात्मा गांधींपर्यंत अनेक शांतीच्या प्रेषितांनी हिंसाचाराचा निषेध केला आहे. युद्ध रणांगणापुरते आणि लष्करापुरते मर्यादित राहिले नाही, ते सर्वकष बनले, अधिक भयानक झाले. साहजिकच युद्ध नको असे सर्वांना वाटते, अनेकजण त्यासाठी धडपडतात; पण युद्धे थांबली नाहीत आणि हिंसाचारही थांबलेला नाही. आज या क्षणी बोस्निया, टोमेन, रुआंडा आणि इतर देशात लक्षावधींची सरसकट कत्तल होते आहे. दुसऱ्या महायुद्धात मेली नसतील इतकी माणसे गेल्या वर्षभरातील कत्तलीत मेली असतील. शांतिपाठकांचा उद्घोष या बळींच्या किंकाळ्यांच्या आवाजात धड ऐकूदेखील येत नाही; पण घोष उच्चरवाने चालू आहे.
 भाकरीपेक्षा बंदूक बरी?
 शस्त्रखरेदीवर पैसा ओतला नाही आणि तो पैसा शिक्षण, आरोग्य इत्यादी विधायक कामांसाठी वापरला तर केवढे बरे होईल! याबद्दल दुमत असण्याचे काही कारण नाही; पण मनुष्य विकास निर्देशांकाच्या डॉ. महबूब अल हक यांच्या कल्पनेने काही विशेष प्रश्न उभे राहतात.
 माणसाची प्रगती मोजायची ती कोणाच्या नजरेने? कोणत्या फुटपट्टीने? तंबाखू, मद्य, मादके सगळी शरीराला अपायकारक, स्वैराचार तर आता मृत्युदंडच देतो आणि तरी या सगळ्या अभद्र गोष्टीमागे लोक आग्रहाआग्रहाने लागतात युद्धाने, दुःख वाढते; पण लष्कराकडील शस्त्रास्त्रं जागतिक उच्चतम दर्जाची असली पाहिजेत, असा आग्रह अंगावर फाटके धोतर नेसलेला सामान्य माणूससुद्धा करतो. लष्कराकरिता झालेल्या खर्चाबद्दल कधी तक्रार होत नाही, ना रस्त्यात ना संसदेत. या परिस्थितीबद्दल डॉक्टरसाहेबांना खेद आहे; पण ही परिस्थिती खरी आहे. लोकांना आजच्या अवस्थेत काही प्रसंगात भाकरीपेक्षा शस्त्रे महत्त्वाची वाटतात, हे नाकारता येणार नाही.
 नवे कठमुल्ला खोमेनी?

 लोक अजाण आहेत. त्यामुळे आपल्याच पायावर धोंडा पाडून घेण्यासाठी ते धावतात. धावतात तर धावोत, असले धावणे आम्ही मनुष्यजातीच्या प्रगतीच्या हिशेबात मुळी मोजणारच नाही. अशी डॉक्टरसाहेबांची दटावणी आहे. तंबाखु,

अन्वयार्थ - एक / २९३