पान:अन्वयार्थ - १ (Anvayarth -1).pdf/287

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 'एकच प्याला'तील सिंधूचे अवतार
 राजकारणाच्या सोयीसाठी बायकांचा बळी घेणे यात धर्ममार्तंडांना काही विशेष आनंद होत असावा. स्त्रियांमध्येही हौताम्याची आणि कुर्बानीची प्रवृत्ती निसर्गतःच मोठी सामर्थ्यशाली असावी. त्याही धर्ममार्तंडांच्या कारवायांना मोठ्या आवेगाने बळी पडतात. देवराला येथे एक राजकुँवर सती गेली तर साऱ्या राजस्थानातील उच्चविद्याविभूषित महिलासुद्धा पारंपरिक राजस्थानी ओढण्या घालून मिरवू लागल्या आणि राजस्थानी सती परंपरेच्या इतिहासाचे गोडवे गाऊ लागल्या. त्यांचे यजमानही आपल्या पाळीव प्राण्यांच्या इमानदारीच्या या प्रदर्शनाने खुष होऊन कृपाकटाक्ष टाकू लागले.
 उपकारकर्त्यांपासून वाचावे कसे?
 'शहाबानो' प्रकरणी मुस्लिम स्त्रियांची अशीच कुचंबणा झाली. शहाबानोस कोर्टाचा आधार घ्यावा लागला त्याअर्थी परित्यक्ता मुसलमान स्त्रियांचा प्रश्न गंभर आहे हे उघड. परित्यक्ता स्त्रियांचा कसला आला आहे धर्म? खडतर जीवन कसेबसे रेटत नेणे, मरण स्वीकारणे किंवा जगाच्या बाजारात शरीर भाड्याने देण्यास उभे राहणे एवढेच काय ते पर्याय. सर्व मुसलमान स्त्रिया त्याविरुद्ध सहजच उठून उभ्या राहिल्या असल्या; पण शहाबानोची कड विश्व हिंदू परिषदेने घेतली, लालकृष्ण अडवाणींनी मुसलमान स्त्रियांचा कैवार घेतला आणि त्या बिचाऱ्यांवर आफत ओढवली. सिंघल - अडवाणी यांच्या सुरात सूर मिळवून आपले हक्क मागणे कोणत्याही मुस्लिम स्त्रीस शक्य नाही. ते परधमींयाशी संग ठेवण्याइतके भयंकर कृत्य मानले जाईल.
 इस देश में रहना होगा

 हिंदू परिवारातील नववधूंच्या दारुण अवस्थेविषयी शहाबुद्दिन किंवा इमाम बुखारी यांनी कधी आपली जबान खोललेली नाही, हे हिंदू अबलांचे भाग्यच म्हटले पाहिजे. मुल्लामौलवींनी तसे केले तर, "आमच्या पुत्रवधू लाखांनी का जळेनात या मुसमानांनी तिकडे लक्ष देण्याचे कारण नाही. सासुरवाशिणींना घराबाहेर काढणे आणि त्यांनी जीव देणे ही आमची उज्ज्वल परंपरा आहे. तिचा आम्हाला अभिमान आहे. ज्यांना हे पाहवत नसेल तर त्यांनी पाकिस्तानात निघून जावे." अशी भाषा चालू होईल. अनेक साध्वी ऋतंभरा, "जाळून मारण्यात आर्य स्त्रियांच्या सनातन संस्कृतीचा परमोच्च बिंदू कसा आहे." असे मोठ्या आवेशाने प्रतिपादू लागतील. मुसलमान नेत्यांनी शरियतचा बचाव केला. कडवेपणे केला; पण मनुस्मृतीवर ते घसरले नाहीत हे हिंदू स्त्रियांचे नशिब. याउलट

अन्वयार्थ - एक / २८८