पान:अन्वयार्थ - १ (Anvayarth -1).pdf/288

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

जनान्यात डोकावण्याचा मोह आर्य धर्ममार्तंडांना आवरत नाही आणि गोषातील दुखियाऱ्यांचा जीव त्यामुळे अधिकच गुदमरतो.
 करारातील 'ठेवा-हकला' कलम
 त्रिवार तलाक प्रकरणात असेच काही होते आहे. दरवर्षादोन वर्षांनी हा विषय फिरून फिरून चर्चेला येतो. यावेळी अलाहाबाद कोर्टातील न्यायमूर्ती तिल्हारी यांच्या एका निवाड्याने हा प्रश्न गाजत आहे.
 एका बैठकीत किंवा एका भूतकाळात तीन वेळा 'तलाक' शब्द उच्चारल्याने पुरुषाला फारकत मिळण्याची पद्धत निदान हिंदुस्थानातील मुसलमान समाजात आहे. इस्लामिक देश म्हणवणाऱ्या पाकिस्तान, इराण, इराक, मोरोक्को, इजिप्त या देशातही त्रिवार तलाकाला मान्यता नाही. हिंदुस्थानातही या पद्धतीने घटस्फोट घेणाऱ्या मुसलमानांची संख्या टक्केवारीत किरकाळ आहे. तरीही या पद्धतीने परित्यक्ता झालेल्या मुस्लिम स्त्रियांचे दुःख कष्ट काय वर्णावे! पण धर्मव्यवस्था ही पुरुषांनी, पुरुषांची, पुरुषांसाठी केलेली असते, तिथे स्त्रियांना न्याय कोठून मिळायचा?
 इस्लाममध्ये विवाह हा संस्कार नाही करार आहे. इस्लामच्या उदयकाळी स्त्रियांची स्थिती निव्वळ गुलामीची होती. त्याऐवजी इस्लामने त्यांना करारी नोकरदारांचे स्थान मिळवून दिले. नको असलेला नोकर झटपट काढता येणे हे कार्यक्षम व्यवस्थेचे लक्षण आहे. खुल्या व्यवस्थेत कामगारांना व पगारदारांना ठेवण्याचे आणि हाकलण्याचे सर्वाधिकार मालकाकडे असावेत. याला आज मान्यता मिळत आहे. मुस्लिम विवाहातील 'ठेवा-हकला' पद्धतीत दोष एवढाच, की ती एकांगी आहे आणि पक्षपाती आहे. स्त्रियांना ठेवा-हकला'चे अधिकार नाहीत. कारण उघड आहे.
 विवाह करार सारे खोटे

 करारनामे दोन तुल्यबळ पक्षात होतात. निकाल लावण्याच्यावेळी काझीने बुरख्यातील दुल्हन राजी असल्याची प्रश्न विचारून कितीही खात्री करून घेतली तरी निकाह काही समबल पक्षातील करारनामा नाही. वधू पक्षाच्या कमजोरीचा फायदा घेऊन त्यांच्यावर लादलेला करार हा मुळातच बेकायदेशीर म्हटला पाहिजे. तुल्यबळपक्षात राजीखुषीने होतो तो करार. विवाहाचा करार वधू पक्षाच्या कमजोरीच्या कारणाने आपोआपच अनैतिक आणि म्हणून बेकायदेशीर जी स्थिती निकाहाची तीच रजिस्टर्ड लग्नाची. हे सगळेच 'करार' समाजातील स्त्रियांची स्थिती पुरुषांच्या बरोबरीची होत नाही तोपर्यंत रद्दबातलच मानले

अन्वयार्थ - एक / २८९