पान:अन्वयार्थ - १ (Anvayarth -1).pdf/283

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

असणारच.राव साहेबांच्या दृष्टीने तर अभिभाषणाचे निमंत्रण येणे हा जीवनमरणाचा प्रश्न होता. राजीव गांधी अमेरिकेत गेले तेव्हा त्यांना अमेरिकन संसदेच्या सभापतींनी आपणहून निमंत्रण दिले होते. तरुण रुबाबदार व्यक्तिमत्त्व, ऋजुहास्य आणि घासून पुसून तयार केलेले भाषण यामुळे राजीवजींनी मोठी जबरदस्त छाप पाडली होती. त्यांचे भाषण दूरदर्शनवर ज्यांनी ज्यांनी पाहिले त्यांना आपण भारतीय असल्याचा अभिमान वाटला होता.
 'सोनिया'चा दिवस
 राव साहेबांना अभिभाषणाचे निमंत्रणदेखील न येणे हे त्यांच्या इथल्या प्रतिमेस बाधा आणणारे झाले असते. राव साहेब पंतप्रधानाच्या खुर्चीवर भले विराजमान झालेले असोत, त्यांची बरोबरी काही जगाच्या नजरेत राजीव गांधींशी नाही असा अर्थ निघतो. विदेश मंत्रालयाने धडपड करून अभिभाषणाचे निमंत्रण तर मिळविले, "सोनियाचा दिवस आजि अमृते पाहिला." राव साहेबांना धन्य धन्य झाले. १० जनपथच्या सोनियाने विरोध केला नसावा.
 अलीकडे अमेरिकन संसदेच्या संयुक्त बैठकीसमोर झालेले आणि गाजलेले भाषण पॅलेस्टिनी मुक्ती शासनाचे यासर अराफत आणि आयरिश मुक्ती चळवळीचे जेरी ॲडम्स यांचे. दोघांच्याही भाषणाच्या वेळी सभागृह तुडुंब भरलेले; किरकोळ अपवाद सोडल्यास सर्व सिनेटर आणि प्रतिनिधी पाहुण्यांच्या प्रेक्षाकक्षेत तुडुंब गर्दी; असा मोठा जबरदस्त कार्यक्रम झाला.
 तीन मिनिटांच्या टाळ्या

 ज्या दिवशी पंतप्रधान नरसिंह राव यांचे अमेरिकन प्रतिनिधी सभागृहात भाषण झाले त्यावेळी मी प्रवासात होतो. भाषण ऐकण्याची, पाहण्याची संधी काही मिळाली नाही. नागपूरला पोचलो तेव्हा ॲडव्होकेट शरद बोबडे आनंदात आणि खुष दिसले. सौ. कामिनी बोबडे पंतप्रधानांबरोबर पत्रकार म्हणून गेलेल्या आहेत; त्यांचा फोनवरून निरोप आला होता, "पंतप्रधानांच्या भाषणानंतर सर्व सभागृहाने तीन मिनिटे उभे राहून टाळ्यांचा कडकडाट केला. पंतप्रधानांच्या भाषणातही अनेक वेळा टाळ्यांचा कडकडाट झाला." राजीव गांधीपेक्षा राव साहेब काही कमी नाहीत त्यांनीही मैदान तितकेच भरले, असे मस्त वातावरण होते. तीन मिनिटांच्या टाळ्या म्हणजे अमेरिकेत विशेष नाही. अमेरिकन रिपब्लिकन किंवा डेमॉक्रेटिक पक्षाच्या अधिवेशनात अध्यक्षीय उमेदवाराची निवड जाहीर होते तेव्हा नवा उमेदवार बोलायला उभा राहतो तेव्हा किंवा त्यांचे भाषण संपल्यावर सारे लोक उभे राहून टाळ्यांचा कडकडाट करतात. शेकडो युवतींचे

अन्वयार्थ - एक / २८४