पान:अन्वयार्थ - १ (Anvayarth -1).pdf/284

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

खास ताफे उत्साहवर्धक नृत्ये करतात. संगीत बेडबाजा यांचा एकच गदारोळ होतो. आपल्या उमेदवारांसाठी इतर कोणाहीपेक्षा जास्त वेळ टाळ्यांचा कडकडाट चालेल असे नियोजन करण्याची अमेरिकेतील राजकीय दलालांची पद्धत आहे. दंतमंजनाच्या ट्यूबवर तीनच प्रकारचे आकार दाखवले जातात. लार्ज, सुपर, आणि जायन्ट. लहान किंवा छोटी ट्यूब नसतेच. तसे अमेरिकेतील औषचारिक टाळ्यांचा कडकडाट तीन मिनिटांच्या खाली नसतोच. मी ही टिप्पणी केली आणि आसपासचे लोक थोडे नाराज झाले.
 किती येती जाती!
 आपल्या देशाचा पंतप्रधान अमेरिकेत गेला म्हणजे आपल्याकडली वर्तमानपत्रे आणि बाकीची सारी माध्यमे त्यांच्या दौऱ्यासंबंधीच्या बातम्यांनीच भरून जातात. आपली समजूत अशी होते की तेथे भेटीच्या काळात लोकांचा चर्चेचा, एकमेव नसला तरी मुख्य विषय भेटीचाच असला पाहिजे. प्रत्यक्षात परिस्थिती अगदी वेगळी असते. राव साहेबांच्या दौऱ्याच्या काळात बहुतेक अमेरिकन नागरिकांना दौरा चाल असल्याची माहितीही नव्हती. तिथल्या वर्तमानपत्रात अग्रभागी विदेशी बातम्या बोस्निया, रुआंडा, सोमालिया आणि येमेन येथील पत्रकारांनी उपेक्षाच केली. त्यांच्या भेटीबद्दल कमालीची उदासिनता होती.
 सभेला गर्दी जमवणे

 राव साहेबांच्या संयुक्त अभिभाषणाच्या वेळी प्रत्यक्षात काय घडले? सभागृह गच्च भरलेले होते. प्रत्यक्ष मोजदाद केली तेव्हा उपस्थितांत एकूण १०० पैकी फक्त १८ सिनेटर आणि ४३५ खासदारांपैकी फक्त ३० राव साहेबांच्या भाषणाला उपस्थित होते. म्हणजे बहुतेक प्रतिनिधी आठवड्याच्या सुट्टीसाठी आपापल्या मतदारसंघात निघून गेले होते. सभागृहाच्या नियमांप्रमाणे कोरमसुद्धा पुरा नव्हता. सभागृहाच्या मोकळ्या जागा पंतप्रधानांबरोबरच गेलेली एक जंबोजेटभर माणसे, इतर निमंत्रित आणि अमेरिकन काँग्रेसच्या सचिवालयातील कर्मचारी यांची भरल्या होत्या. सभागृह भरलेले असणे अमेरिकन संसदेच्या प्रतिष्ठेकरिता आवश्यक होते. गैरहजर सिनेटर आणि खासदार यांनी जाणून बुजून राव साहेबांचा अपमान केला असे नाही. राव साहेबांच्या येण्या-जाण्यात त्यांना काही स्वारस्यच नव्हते.
 शालेय वक्तृत्व स्पर्धा
 राव साहेबांच्या भाषणास खूप टाळ्या पडल्या 'वॉशिंग्टन पोस्ट'ची पत्रकार मेरी मोनोरो लिहिते, "टाळ्या वाजवणारे प्रामुख्याने जागा भरण्यासाठी घुसवलेले

अन्वयार्थ - एक / २८५