पान:अन्वयार्थ - १ (Anvayarth -1).pdf/269

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 "त्या दिवशी दुपारी फटक्याची शिक्षा देणारे आम्ही पाचजण होतो. प्रत्येकाला मनात आशा वाटत होती, की आपली पाळी शेवटी यावी, कदाचित फटके मारणाऱ्याचे हात तोपर्यंत थोडेफार तरी थकून जातील. माझे दुर्दैव, मला पहिल्यांदाच नेण्यात आले."
 दोन वॉर्डर्सनी मला धरून फटके मारण्याच्या खोलीकडे नेले, नंतर त्यांच्या आधाराखेरीज मला परत येता आलेच नसते. फटका मारणारा छडी दोन्ही हाताने वाकवून बघत होता, माझे पाय कापू लागले.
 फटके मारणारा मोठा धिप्पाड आणि कमावलेल्या शेरीराचा होता. तो माझ्याकडे पाहत होता; पण मी त्याला दिसत नव्हतो. दुसऱ्या वॉर्डरने माझे कपडे उतरवले. एका लाकडी चौकटीला हातपाय बांधण्यात आले. माझ्या सगळ्या अंगास कापरे भरले होते आणि भीतीने घाम फुटला होता.
 मग छडीचा आवाज मी ऐकला. एखादी सपाट फळी भिंतीवर आपटावी तसा. अर्ध्याएक सेकंदानंतर छडी माझा पृष्ठभाग फाडून घुसली आहे याची मला जाणीव झाली. मी किंचाळलो. एखाद्या पिसाळलेल्या प्राण्याप्रमाणे धडपडलो. काहीही करून येथून सुटून पळून जावे एवढी एकच इच्छा राहिली. मला बांधून ठेवले नसते तर पहिल्याच छडीच्या झटक्याने मी मैलभर तरी पळत गेलो असतो.
 मी किंचाळ्या देतच राहिलो आणि फटके चालूच राहिले. एक फटका एक मिनिट काही फटके पूर्वीच्या फटक्यांच्या जागीच पडत आधीच फाटलेले कातडे आणखी फाटत जाई.
 शिक्षा पार पडल्यानंतर एक डॉक्टरने काही निर्जंतुकं लावली. माझा पृष्ठभाग सुजून मूळ आकाराच्या दुप्पट झाला होता. मांड्या निळ्याकाळ्या पडल्या होत्या. दोन आठवडे मला बसता येत नव्हते, पाठीवर झोपता येत नव्हते, अंघोळ करता येत नव्हती, की साधी चड्डीसुद्धा घालता येत नव्हती.
 राक्षसांचे योग्य पारिपत्य

 आर्थर रोड, तिहार, नाशिक येथील तुरुंगात अट्टल खुनी, गुंड, कैदी तुरुंगात स्वतःकरिता आलिशान कमरे बांधून घेतात. भरगच्च जेवण, मद्ये, मादके, त्यांना उपलब्ध असतात. टेलिव्हिजन, टेलिफोन, वातानुकूलक, काहीच कमी नाही आणि त्याचवेळी या गुंडांच्या अत्याचाराला बळी पडलेले भाकरीला मोताद होऊन वणवण फिरत असतात आणि त्यांनी बलात्कार केलेल्या तरुणी आकाश फाटल्याप्रमाणे धाय मोकलून रडत असतात. ही चित्रे पाहिली म्हणजे आमच्या

अन्वयार्थ - एक / २७०