पान:अन्वयार्थ - १ (Anvayarth -1).pdf/268

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

जगभर अमेरिकी कायद्यांचाच अंमल झाला पाहिजे ही मग्रुरी या बडबडीमागे लपलेली आहे.
 अमेरिकन तुरुंगापेक्षा फटके परवडले
 अमेरिकन तुरुंगामध्ये ज्यांनी काही काळ कंठला आहे अशांनी लिहिलेली वर्णने आणि आत्मचरित्रे उपलब्ध आहेत. अमेरिकन तुरुंगांची रचना बहुमजली पिंजऱ्यांसारखी असते, कोठड्या छान स्वच्छ असतात. अंथरूण, पांघरूनण, कपडे साफ स्वच्छ असतात. कैद्यांना मिळणाऱ्या जेवणाचा मेनू पाहून आमच्यापैकी भल्या मध्यमवर्गीयांच्या तोंडाला पाणी सुटले, वैद्यकीय सेवा उत्तम, अमेरिकन कैदेत काही काळ राहिलेल्या माणसाची दातांची निगा इतकी चांगली राखली जाते, की तुरुंगात राहिलेला माणूस त्याच्या दातावरून ओळखू येतो; पण संध्याकाळी एकदा कोठडीत परतले, की भयानक गुंडगिरीचे साम्राज्य न मानल्यास तुरुंगातही खून पाडले जातात. अमेरिकन कैदेत राहिला आणि समलिंगी संभोगाला बळी पडला नाही असा कैदी स्त्री किंवा पुरुष असणे जवळजवळ अशक्य आहे. मध्यंतरी हिंदुस्थानातील एक पुढारी, नेहरू घराण्याचा दोस्त श्री. युनुस यांच्या मुलाने अमेरिकेत काही पराक्रम गाजवले. त्याला दीर्घ मुदतीची कैदेची सजा झाली. अमेरिकन कैद म्हणजे काय भयानक अनुभव आहे याची शब्दचित्रे त्यावेळी आपल्याकडील वर्तमानपत्रात आली होती. पंतप्रधान राजीव गांधी यांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावून युनुसपुत्राची सोडवणूक केली. अमेरिकन कैदेतील अत्याचारांना सामोरे जाण्यापेक्षा पाचपन्नास फटक्यांची शिक्षा पुष्कळ कैदी आनंदाने कबूल करतील.
 अमेरिकी तुरुगपद्धतीबद्दल अनेक तक्रारी आहेत. तुरुंगात गुन्हेगारी बळावते, एका कैद्यावर ३०,००० डॉलरच्या आसपास वार्षिक खर्च होतो, कैदी आरामात राहतात आणि त्यांच्या गुन्ह्यांना बळी पडलेले आणि त्यांचे कुटुंबीय दारिद्र्यात आणि हालअपेष्टात दिवस काढतात हाही मोठा अन्याय आहे.
 फटक्यांचा प्रथमपुरुषी अनुभव

 थोडक्यात फटके म्हणजे अमानुषता आणि कैद म्हणजे सुसंस्कृतपणा हा समज काही खरा नाही; तरीही अमेरिकेतील वर्तमानपत्रे फटक्यांच्या शिक्षेविरुद्ध लिखाणांनी भरून गेली आहेत. फटक्यांच्या शिक्षेचा अनुभव घेतलेली माणसे त्या अनुभवाबद्दल तपशीलवार लिहीत आहेत. ४० वर्षांचा एक माणूस २३ वर्षांपूर्वी म्हणजे तो केवळ १० वर्षांचा असताना त्याने सोसलेल्या फटक्यांच्या शिक्षेचा अनुभव लिहतो.

अन्वयार्थ - एक / २६९