पान:अन्वयार्थ - १ (Anvayarth -1).pdf/267

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

सुनावली गेली आणि येथे एका मेठ्या नाट्यमय कथानकाला सुरुवात झाली.
 सिंगापूरमध्ये फक्याची शिक्षा अरब राष्ट्रांप्रमाणे जाहीररीत्या दिली जात नाही. कैद्याच्या अंगावरून चड्डीखेरीज सगळे कपडे उतरवले जातात. किडनींना अपाय होऊ नये म्हणन खास पॅडस लावले जातात. निर्जतुकात बडवलेल्या १.२७ सेंमी जाडी आणि १.२० मीटर लांबीच्या दंडुक्याने फटके देण्यात येतात.
 अमेरिकेची मग्रुरी आणि तत्त्वज्ञान
 अमेरिकन तरुणाला फटक्यांची शिक्षा होणार असे कळताच अमेरिकेत मोठी खळबळ माजली. खुद्द राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन यांनी फेवर दया दाखवण्यात यावी अशी विनंती केली. फटक्यांची शिक्षा योग्य-अयोग्य याबद्दल मोठा वादविवाद चालू आहे. अशा कडक शिक्षांमुळे सिंगापूरने जी प्रगती साधली तिची सगळेजण शिफारस करतात. इंग्लिश शाळांचा अनुभव असलेले शिक्षकांच्या हातून खाल्लेल्या छड्यांच्या फटक्यांमुळे आपले आयुष्याचे कल्याण झाले असे आग्रहाने सांगतात. 'छडी वाजे छम छम् विद्या येई घमघम्' या अर्थाच्या म्हणी प्रत्येक भाषेत आहेतच.
 याउलट शारीरिक दंड देण्याची कल्पना बहुतेक भद्र लोकांना अमानुष वाटते. अशा शिक्षांना मान्यता मिळाली तर कैद्यांचा छळ करण्यासाठी त्याचा उपयोग होईल अशी त्यांना थोडीफार रास्त भीती पण वाटते. शरीरिक दंड झालेल्या माणसाला होतात त्यापेक्षाही जास्त वेदना त्याच्या जवळच्या नातेवाईक मित्रमंडळींना होतात. आपल्या कोणा प्रिय माणसास जाणीवपूर्वक ठरवून ठरावीक वेळी शरीरयातना दिल्या जाणार आहेत या कल्पनेनेच जवळच्या नातेवाइकांना आजारीपण ओढवते. इत्यादी युक्तिवाद अमेरिकेत केले जात आहेत. गमतीची गोष्ट म्हणजे फटक्यांची शिक्षा रानटी वाटणाऱ्या अमेरिकेत आजही मृत्युदंड रद्द झालेला नाही. विजेची खुर्ची, गॅस चेंबर अशा आधुनिक मर्गांनी मृत्युदंड दिला जातो; पण फटक्यांची शिक्षा मात्र त्यांना अमानुष वाटते.

 या तक्रारीमागे एक महासत्तेचा दंभ आहेच. अमेरिकेच्या नागरिकाला एवढ्याशा चिमुरड्या देशात फटक्यांची शिक्षा होणे हा राष्ट्रीय अपमान आहे ही मनातली रुखरुख, तत्त्वज्ञान मात्र वेगळे, फटक्यांची शिक्षा जंगली आहे, सुसंस्कृत समाजात कोणत्याही गुन्ह्याकरतिा दंड आणि कैद एवढ्याच शिक्षा असाव्यात, बाकीच्या सगळ्या शिक्षा मानवतेविरुद्ध आहेत. अमानवता कशात आहे आणि कशात नाही हे ठरवण्याचा स्वयंसिद्ध अधिकार अमेरिकींना आहे. इतर देशांनी आपला रानवटपणा आपल्या नागरिकांवर चालवावा. इ.इ. पण अमेरिकी नागरिकांवर

अन्वयार्थ - एक / २६८