पान:अन्वयार्थ - १ (Anvayarth -1).pdf/264

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

आज दलित आहेत असेही नाही. प्रकाश आंबेडकर, रामविलास पास्वान यांना कोणीही दलित कसे म्हणू शकेल?
 हा वाद खरा केवळ नावापुरता मर्यादित नाही. चौथ्या वर्णातील समाजांना भविष्यात काय स्थान राहणार आहे याबद्दल विचार भिन्न असल्यामुळे नावाविषयी वाद तयार होतो.
 चौथ्या वर्णातील माणसे जास्त करून बलुतेदारी करतात. इंग्रजांच्या आगमनानंतर त्यांचे उद्योगधंदे बुडाले. आर्थिक, सामाजिक विक्राळ अन्यायाला तोंड देण्याकरिता आंबेडकरांनी त्यांच्या अनुयायांना शहराकडे जाण्याचा सल्ला दिला. तेथे जाऊन त्यांनी काय करायचे? बलुतेदारीऐवजी आलेल्या उद्योगांचे लागणारे भांडवल त्यांच्याकडे नव्हते आणि तंत्रज्ञानही नव्हते. त्यांच्या परंपरागत कौशल्याला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन बाजारपेठेत त्यांना उद्योजक म्हणून उभे करणारी व्यवस्था मांडण्याऐवजी त्यांनी शहरात जाऊन नोकऱ्या मिळवाव्यात म्हणजे परंपरागत सामाजिक अन्यायातून त्यांची मुक्तता होईल, अशा विचाराची नोकरीलक्ष्यी दलित चळवळ उभी राहिली.
 बन्सीधरा! आता तू कोठे जाशील?
 याउलट, गांधीजींचा सल्ला 'गावाकडे चला' असा होता. स्वयंभू गावेच त्यांचे आदर्श जग होते. एक सारा बहुसंख्य समाज नोकऱ्या करून वर येईल अशा अजागळ कल्पनेवर त्यांचा विश्वास नव्हता.

 आता गांधीजींच्या स्वावलंबी गावांच्या स्वप्नाचा पाडाव झाला आहे आणि मोठ्या प्रमाणावर नोकऱ्या उपलब्ध करून देणाऱ्या समाजवादी व्यवस्थेचाही पाडाव झाला आहे. स्वतःच्या पायावर उभे राहून स्पर्धेला टक्कर देऊ शकणाऱ्या उद्योजकांचे नवे युग येते आहे. या खुल्या व्यवस्थेच्या समाजाचे नेतृत्व भारतीय उद्योजकांचे नवे युग येते आहे. या खुल्या व्यवस्थेच्या समाजाचे नेतृत्व भारतीय उद्योजकांकडे म्हणजे बलुतेदार समाजाकडे असावयास पाहिजे होते; पण त्यांचे व्यवसाय केव्हाच मोडून पडले आहेत आणि उद्योजकतेकडे जाण्याऐवजी नोकऱ्यांकडे धाव घेण्यास, सांगितले. काही काम न करता, उत्पादन न करता भरपेट पगार भत्ते मिळवून देणाऱ्या नोकऱ्यांचा जमानाही संपत आला आहे. माट्यांच्या कथेतील 'बन्सीधरा'प्रमाणे दलित समाज गावचा राहिला नाही आणि शहरातला बनला नाही. सगळ्या समाजाची आर्थिक कोंडी झाल्याने उदारमनस्कता संपली. परिणामतः पिढ्यान्पिढ्यांचे अन्याय दूर करायचे म्हटले तरी खळखळ सुरू होते.

अन्वयार्थ - एक / २६५