पान:अन्वयार्थ - १ (Anvayarth -1).pdf/263

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

सवर्णांचा; पण म्हणजे त्यांना कधी कोणाचा स्पर्श झालाच नाही हे खरे नाही. 'अस्पृष्ट' शब्द बाद ठरला.
 खुद्द डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनाही हा नामाभिधानाचा प्रश्न खूप सतावून गेला. त्यांच्या लिखाणात त्यांनी अस्पृश्य आणि महार, मांग असे जातिवाचक शब्द सरसकट वापरले. इंग्रजी भाषेचा आधार घेऊन Depressed Classes असा शब्द त्यांनी वापरला. नंतर संबंधित जमातींची जंत्री १९३५ च्या कायद्यात परिशिष्टात देण्यात आली तेव्हा त्यांनी या समाजांचा उल्लेख 'शेड्यूल कास्ट्स (अनुसूचित जाती)' म्हणून केला. शेवटी बौद्ध धर्म स्वीकारून 'नवबौद्ध' शब्द तयार केला.
 गांधीजींच्या बाबतीत तर हा प्रश्न आणखीच बिकट होता. गांधीजी स्वतःला सनातनी हिंदू मानत असत. हिंदू धर्माचे स्वरूप वर्णाश्रम धर्माचे आहे. त्यामुळे चातुर्वर्ण्यालाही त्यांची मान्यता होती. विशुद्ध अवस्थेतील चातुर्वर्ण्य कोणाही जातिवर्णावर अन्याय करणारे नव्हते. चातुर्वर्ण्य कोणालाही हीन मानत नाही; आपण सगळी ईश्वराची लेकरे आहोत; त्यात चौथ्या वर्णाचेही लोक आले. 'ही परमेश्वराची लेकरे' आहेत या अर्थाने गांधीजींनी 'हरिजन' शब्द वापरण्यास सुरुवात केली. गांधीजी संपादित असलेल्या साप्ताहिकाचे नावही 'हरिजन' होते.
 हरिजन आणि सैतानपुत्र
 गांधीजींच्या या प्रस्तावाने अडचण दूर झाली नाही. परंपरागत नावे वापरणे विनाकारण निषिद्ध मानले आणि त्याऐवजी दुसरे काही नाव वापरायला सुरुवात केली तर साहजिकच विचित्र प्रश्न उभे राहतात. मायावतीबाईंनी असा एक प्रश्न उपस्थित केला आहे. 'दलित', 'हरिजन' आहेत, 'परमेश्वराची लेकरे' आहेत; मग बाकीचे लोक काय 'सैतानाची लेकरे' आहेत? हा त्यांचा तर्कशुद्ध प्रश्न आहे. (हिंदू व्यवस्थेत ३३ कोटी देव आहेत; पण सैतान नाही ही विसंगती सोडल्यास) पण सर्वांनाच 'हरिजन' म्हटले तर 'बहिष्कृत समाजा'चा उल्लेख वेगळा करायचा झाल्यास शब्द कोणता वापरावा? हा प्रश्न कायमच राहतो.
 नोकरीलक्ष्यी दलित चळवळ

 आंबेडकरी परंपरेतील कार्यकर्त्यांना 'दलित' हा शब्द पसंत आहे; पण हा शब्दही योग्य नाही. 'दलित' काही केवळ काही ठरावीक जातीतच जन्मतात असे नाही; सर्व जातीत अन्यायाचे बळी आहेत. शिवाय, या जातींतील सगळेच

अन्वयार्थ - एक / २६४