पान:अन्वयार्थ - १ (Anvayarth -1).pdf/259

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

आवडत नाही. परदेशी कामगार कमी मजुरीत अधिक काम करण्यासाठी तयार असतात, बहुधा अधिक कर्तबगारही असतात याचे यजमान देशातील अन्नसौकर्याने सुस्तावलेल्या लोकांना मोठे वैषम्य वाटते. नवीन पिढीत आपली मुले-मुली परदेशी लोकांशी संबंध जोडतात. हे तर बहुतेकांना नापसंत असते. युरोपअमेरिकेतील सगळ्याच देशांत आता प्रवेशावर बंधने आहेत, एवढेच नव्हे तर जवळजवळ प्रत्येक देशात परदेशी लोकांना काढून लावण्याकरिता 'फॅसिस्ट' पद्धतीच्या चळवळी जोर धरीत आहेत. पाश्चिमात्य कारखानदारांना मात्र बाहेरचे स्वस्त मजूर आपल्या देशात यावेत असे वाटते.
 इंडियन स्वप्न - 'हिरवे कार्ड'
 हिंदुस्थानसारख्या तिसऱ्या जगातील देशात, विशेषतः तरुणतरुणींना परदेशगमनाचे मोठे आकर्षण वाटते. उच्चशिक्षित असोत का कारागीर, व्यापारी असोत की मजूर, युरोप, अमेरिकेसारख्या पुढारलेल्या सुसंस्कृत देशात जायचे असो, की ओमान, दुबईसारख्या मध्ययुगीन सरंजामशाही देशांत, लोकांना परदेशी जाण्याची मोठी उत्सुकता असते. तिसऱ्या जगातील सुशिक्षित आणि कुशल कामगार आणि पहिल्या जगातील कारखानदार या दोघांचे हितसंबंध जुळतात. दोघांनाही जगभरची विदेशगमनावरील बंधने ढिली व्हावीत असे वाटते. हिंदुस्थानात तर डॉक्टर, वकिलांपासून परिचारिका, गवंडी, मजूर इथपर्यंत सर्वांना 'विजा' आणि 'ग्रीनकार्ड' मिळणे म्हणजे 'स्वर्गद्वार अपावृतम्' असा आनंद वाटतो.
 'स्वदेशी' आंतरराष्ट्रीयीकरण
 अस्मिता राखून आपल्या विशेष शैलीने विकास साधू इच्छिणारे सर्वजण सुलभ विदेशगमनाच्या सवलतींना विरोध करतील. विदेशगमनाने गरीब राष्ट्रांच्या बुद्धिसामर्थ्यांची गळ होईल. खुली व्यवस्था करणे म्हणजे राष्ट्रांचे विसर्जन नाही, राष्ट्राराष्ट्रातील वाढते सहकार्य आहे, असे मांडतील.
 याउलट विदेशगमन कोणालाही केव्हाही खुलेपणाने करता आले पाहिजे, हे स्वातंत्र्य प्रस्थापित झाले पाहिजे असा पक्ष दुसरी बाजू मांडेल.

 गंमत इथेच आहे. डंकेल प्रस्तावांना विरोध कोणी केला? 'भारता'ला लुटण्याची आकांक्षा बाळगणाऱ्या 'इंडिया'वाद्यांनी केला; पण हा देश सोडून साहेबाच्या देशातच जाऊन राहण्याची संधी मिळत असेल तर ती 'इंडिया'वाद्यांना अधिक आकर्षक वाटणार! 'राष्ट्रवाद' आणि 'स्वदेशी'च्या ललकाऱ्या देऊन स्वार्थाचे

अन्वयार्थ - एक / २६०