पान:अन्वयार्थ - १ (Anvayarth -1).pdf/253

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

कशी पटावी? लोकांना पटणारी भाषा बोलणारे हृदयसम्राट झिरिनॉव्सकी झपाट्याने उदयाला येत आहेत.
 हिंदुस्थानातही खुली व्यवस्था आणि जागतिक व्यापाराचे खुलीकरण यावर स्थानिक हृदयसम्राट बेफाट बोलू लागले आहेत. शिवसेनेचे हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचाही आता 'स्वदेशी' अभिमान उफाळून आला आहे आणि त्यांनीही आपला डंकेलला विरोध असल्याचे जाहीर केले आहे. खुलीकरणाला सर्व स्मग्लर, कारखानदार आणि त्यांचे दोस्त इत्यादींचा विरोध असावा हे साहजिकच आहे. लायसेंस-परमीटचे राज्य संपले, की चोरबाजारातील दादांना कोण विचारतो? सोन्याच्या आयातीवरील बंदी उठली, की निम्मे तस्कर बुडीत जातात, रुपया खुला झाला, की हवाला कारभाराला कुलूप लागते आणि परदेशी स्पर्धा करायची म्हटले, की येथील कारखानदारांचे हातपाय कापू लागतात. हे सगळं समजण्यासारखं आहे. या मंडळींची विवेकाची आणि अभ्यासाची परंपरा नाही. त्यांच्याकडून दुसरी अपेक्षा ती काय ठेवायची?
 समाजवादी उरले ते काय अभागी देशांत
 आश्चर्य आहे ते समाजवादी-साम्यवादी मंडळींच्या कोडग्या धारिष्ट्याचे. जन्मभर ज्या व्यवस्थेचा आपण जयजयकार केला ती समाजवादी, संरक्षणवादी, कल्याणवादी, सरकारवादी व्यवस्था बिनबुडाची होती; तो खुळचट प्रयोग जिद्दीने यशस्वी करण्याच्या आग्रहापोटी कोट्यवधी लोकांची कत्तल झाली, कितीजणांची आयुष्ये उद्ध्वस्त झाली त्यांचा हिशेब नाही. रशियासारखा देश, ज्याचा पराभव ना नैपोलियन करू शकला, ना हिटलर; त्याला साम्यवादाने पार बेचिराख केले. खुद्द रशिया आणि चीनमधील साम्यवादी मंडळी सारा समाजवादी अभिनिवेश गुंडाळून ठेवून खुल्या अर्थव्यवस्थेकडे हिमतीने वाटचाल करू लागली; पण याचे भारतातील जॉर्ज फर्नांडिसना काहीच सोयरसुतक नाही; खुल्या व्यवस्थेला अतिरेकी विरोध उभा करण्याचा त्यांचा अट्टहास चालू आहे. नेहरू व्यवस्था पुरेशी समाजवादी नाही, भांडवलदारीच आहे म्हणून तिच्यावर पन्नास वर्षे तुटून पडणारे 'लालभाई' खुल्या व्यवस्थेपेक्षा नेहरू व्यवस्थाच परवडली म्हणून तिचाच उदोउदो करीत आहेत.
 धनदांडग्यांचे म्होरके

 जॉर्ज फर्नाडिस कामगारांचे पुढारी. कामगारांनी काम कमीत कमी करावे; शक्यतो करूच नये; लायसेंस-परमीट व्यवस्थेमध्ये कारखानदारांना मिळणाऱ्या गडगंज नफ्यातील मोठा हिस्सा संप वगैरे करून बळकावून घ्यावा. यालाच

अन्वयार्थ - एक / २५४