पान:अन्वयार्थ - १ (Anvayarth -1).pdf/248

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

प्रास्ताविकादाखल काही बोलतो, या सूत्रधाराचे भाषण देवतांच्या नाटकातल्याप्रमाणेच असते. मुलाखती घेणाऱ्या पत्रकारांपैकी एकानेही डंकेल प्रस्ताव मुळात डोळ्याने पाहिलेलाही असल्याचे लक्षण दिसत नाही. आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या आजच्या समस्या काय? त्यात आजच्या शेतीमालाच्या व्यापाराची परिस्थिती काय? कोणत्या देशात शेतकऱ्यांना किती सबसिडी दिली जाते? इत्यादी प्रश्नांचा एकालाही गंधमात्र बोध नाही.
 कॅमेऱ्याचा दबदबा
 थातुर मातुर वर्तमानपत्रातील बातम्या फक्त वाचून हे 'पत्रपंडित' टेलिव्हिजन कॅमेऱ्याचा संच घेऊन 'कोपनीयः कवयः क्षीतिद्रै:' अशा गुर्मीत फिरताना त्यांचा थाट काय वर्णावा? एवढ्या कॅमेऱ्याच्या आधाराने कोणीही नेता, विचारवंत, कार्यकर्ता कलाकारला यांच्यासमोर ठाकावे, वही-पेन्सिल घेऊन बसलेल्या कसेबसे बसतात. जमेल ती उत्तरे देतात. प्रत्येकाचा निदान अर्ध्या तासाचा मुलाखतीचा कार्यक्रम नोंदला जातो. चहापाणी, फराळ होतो. कॅमेऱ्याचा सगळा पसारा गुंडाळून पत्रकार दुसऱ्या शिकारीकडे निघतात.
 सत्य; पण पुरे नाही, सगळे नाही

 दोनचार दिवसांत कार्यक्रम टीव्ही संचावर दिसतो, प्रास्ताविक झडते. डंकेलमुळे देशाच्या सार्वभौमत्वाला धक्का बसेल काय? असा एक प्रश्न सूत्रधार पुढे टाकतो आणि मग लागोपाठ पाचदहा माणसांची उत्तरे दृश्यांबरोबरच दाखवली जातात. तास दीडतासाच्या एकूण मुलाखतीपैकी मिनिट दीडमिनिटाचे तुकडे दाखवले म्हणजे कळस झाला. दाखविलेले तुकडे संदर्भापासून ओरबाडून काढलेले, निरर्थक. हिंदुस्थानातील पत्रकार बहुतेक स्वत:ला डावे मानणारे आहेत. त्यामुळे डंकेलचे एक अक्षरही न वाचता त्याविषयी त्यांच्या मनात अढी आहे. डंकेलविरोधी मते तपशीलवार दाखवली, ऐकवली जातात. विरोधी मतांच्या पुरस्कर्त्यांनी नाही म्हणून हलवलेली मान पुरी दाखवली तरी नशीब! समर्थकांचा मुखडा सुबक दिसेल असे चित्रण वापरायचे. विरोधकांनी तोंड उघडले तर त्यांचे वेडेवाकडे दात लोकांच्या नजरेत विशेष भरावे इतकी चलाखी या कार्यक्रमात सरसहा केली जाते. राजीव गांधी दाखवायचे तर एखाद्या सिनेमा नटाप्रमाणे व्यवस्थित मेकअप केलेले पी. व्ही., सिंगांचे चित्रण करायचे तर जांभई देताना, तोंड वेडेवाकडे उघडले गेले असताना, अशी ही इलेक्ट्रॉनिक युगातील युक्ती आहे. दाखवलेले असत्य आहे असेही नाही. सत्य आहे; पण संपूर्ण सत्य नाही. सत्याशिवाय खूपच काही आहे.

अन्वयार्थ - एक / २४९