पान:अन्वयार्थ - १ (Anvayarth -1).pdf/247

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 लोकमान्य केसरी ते...
 प्रत्येक तंत्रज्ञानाच्या युगात एका वेगळ्या पत्रकारितेचा जन्म होतो. हातछपाई यंत्राने टिळकांच्या पत्रकारितेला जन्म दिला. मुद्रण सुलभ झाले. दैनिके, नियतकालिके हजारोंनी निघू लागली. वर्तमानाचे वास्तव दाखवण्याऐवजी आपापल्या पक्षाच्या किंवा मालकाच्या हितसंबंधांच्या चष्म्यातून समाचार, संपादणे ही पत्रकारांची सर्वसाधारण भूमिका झाली. छापलेले ते ते खरे नसते हे उमजायला लोकांना थोडासा वेळ लागला; पण हा नवा खेळही त्यांनी आत्मसात केला आणि अनुभवाने नवे आडाखे बांधले. गोविंद तळवळकर अग्रलेखात असे लिहितात; मग सत्यस्थिती अशी असली पाहिजे, माधव गडकरींच्या लिखाणात हे एक झुकते माप असायचेच ते सुधरून घेतले पाहिजे, मधुकर भावे असे म्हणतात काय? तोंडात थोडी मिठाची गुळणी धरूनच त्यातले तथ्य तेवढे घेतले पाहिजे. इ. इ.
 नवी पत्रकारिता
 इलेक्ट्रानिक प्रसारमाध्यमांच्या युगात एका नव्या पत्रकाराचा जन्म होतो आहे. 'चक्षुर्वौ सत्यम्' सांगणारा कॅमेरा खोटे बोलत नाही; पण कॅमेऱ्याने टिपलेल्या गोष्टींचे संपादन करून मांडणी करणारा आजही खोटी बतावणी करू शकतो. प्रसार माध्यमांच्या नव्या युगात हे कसब दाखवणाऱ्या नव्या पत्रकाराचा आणि पत्रकारितेचा उदय झाला आहे.
 जुन्या काळातील काही पत्रकार आपल्या पत्रकारितेला भलेभले घाबरतात या गुर्मीत चालत. पुरातनकाळातील राजदरबारातील एका कवीने राजाला बजावले, "राजा कवींना नाखुष करू नकोस, लंकाधीश बदनाम झाला आणि दशरथाचा पोर दिगंत कीर्ती पावला, हा सारा आदिकवीचा प्रभाव हे विसरू नकोस." आपण कोणाही नेत्यास मोठे करू शकतो किंवा संपवू शकतो असे मानणाऱ्या पूर्वाश्रमीच्या पत्रकाराचा नवा इलेक्ट्रॉनिक अवतार पुढे येत आहे. कॅमेऱ्याची मग्रुरी लेखणीच्या शतपट मोठी आहे.
 एक उदाहरण पाहा. गेल्या वर्षी सहा महिन्यांत डंकेल विषय सगळीकडे गाजतो आहे. वर्तमानपत्रांत तसाच टेलिव्हिजनवरही. या विषयावरील अनेक कार्यक्रम जवळजवळ दररोज कोणत्या ना कोणत्या टीव्हीच्या केंद्रावर दाखवले जातात.
 संपादणी आणि बतावणी

 कार्यक्रमाच्या सुरुवातीला कोणी एक वार्ताहर सादरकर्ता म्हणून

अन्वयार्थ - एक / २४८