पान:अन्वयार्थ - १ (Anvayarth -1).pdf/246

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.






इलेक्ट्रॉनिक्स पत्रकारितेमुळे मोकळे जाहले श्वास


 दूरदर्शन, स्टार टीव्ही, सी.एन.एन., जैन आणि डझनभर इतर शहरवासीयांच्या दिवाणखान्यात आधुनिक तंत्रज्ञानाने दोन डझनावर चॅनेल आणून सोडले आहेत. हातातील दूरनियंत्रकाच्या एका खटक्याने क्षणार्धात जगाच्या पाठीवर कोठेही चाललेले खेळ, संगीत, बातम्या यांचे कार्यक्रम नजरेसमोर आणता येतात. प्रसारसाधनांवरील सरकारी नियंत्रणे आधुनिक तंत्रज्ञानाने उधळून लावली आहेत. कोणी हुकूमशहा हृवचारांच्या देवाणघेवाणीत आता अडथळे आणू शकणार नाही. माहितीवरची मक्तेदारी संपुष्टात आली आहे.
 आधुनिक तंत्रज्ञानाच्या प्रचंड झेपेने आता बातम्या लपवता येणार नाही, खोटा प्रचार करणे कठीण होईल. वाचा खोटे बोलेल, लेखणी खोटे लिहील; पण कॅमेरा खोटे बोलू शकत नाही आणि यापुढे प्रसार डोळ्यांच्या दृष्टीने आणि कानाच्या श्रवणाने होणार आहे. लेखी शब्दाने नाही. माणसा माणसातील विचारांच्या आणि अनुभूतीच्या देवाणघेवाणीकरिता शब्दांची सद्दी संपली. दृक्श्राव्य माध्यमांचे राज्य आले. कॅमेरा टिपेल आणि सांगेल; कोणी खोटेपणा करू धजला तर स्पर्धेच्या आणि चढाओढीच्या या जगात त्याचे खोटे उघडे पडल्याखेरीज राहणार नाही. रवीन्द्रनाथ टागोरांच्या स्वप्नातील भिंतीविरहितचे जग तयार होईल अशी आशा वाटत होती.

 प्रत्यक्षात काही वेगळेच घडते आहे. आगीने म्हटले तर स्वयंपाक करता येतो, म्हटले तर आग लावता येते. बंदूक माणसे मारत नाही, माणसे माणसांना मारतात. बंदूक हे फक्त साधन असते. आधुनिक तंत्रज्ञानाने विचार, माहिती यांच्या अनिर्बंध प्रसाराची साधने उपलब्ध करून दिली; पण म्हणजे प्रसारमाध्यमे स्वच्छ झाली, खोटेपणा संपला असे नाही.

अन्वयार्थ - एक / २४७