पान:अन्वयार्थ - १ (Anvayarth -1).pdf/245

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

मुखर्जीनाच बोलावण्याखेरीज गत्यंतर नाही. प्रशिक्षणाच्या कागदपत्रात विरोधकांच्या आरोपांची यादी दिली आहे आणि एक एक क्रमाने ते आरोप चुकीचे आहेत, भ्रममूलक आहेत, निराधार आहेत असे म्हटले आहे. झाले प्रशिक्षण! काँग्रेसची खरी गोची अशी आहे, की डंकेल प्रस्तावाचा पुरस्कार करताना नेहरूंपासून सर्व काँग्रेसी पंतप्रधानांनी देशाचे वाटोळे केले याचा कबुलीजबाब दिल्ल्याखेरीज डंकेलचे खरे समर्थन करताच येत नाही. आपल्या खानदानातील 'कृष्णकृत्ये' प्रकाशात यावीत अशी तर काँग्रेसवाल्यांची इच्छा नाही.
 ७० टक्के उणे सबसिडी
 "शेतकऱ्यांची सबसिडी डंकेलमुळे कमी होणार नाही. कारण हिंदुस्थानातील सबसिडी १०% पेक्षा कमीच आहे, पुष्कळशा बाबतीत तर ती नकारात्मक म्हणजे 'उणे' आहे." अशी गोलमोल संपादणी काँग्रेसवाल्यांना करावी लागते. भारतीय शेतकऱ्यावरील उणे सबसिडी ७०% आसपास आहे, म्हणजे शेतकऱ्यांवर ७०% एवढा करांचा भार आहे, याचा कबुलीजबाब त्यांच्या तोंडून निघत नाही. कारण एवढ्या एकाच कबुलीजबाबावर काँग्रेसचे 'पानिपत' होऊ शकते.
 एक खोटे बोलणाऱ्याला दरवेळी खोटे बोलावे लागते आणि आपल्याच खोट्यात तो अधिकाधिक गुंतत जातो. डंकेल विरोधकांचा पाया अधिकाधिक खोलात जातो आहे. कारण एक खोटे लपवण्याच्या प्रयत्नात ते शंभर खोट्यांच्या गुंत्यात सापडले आहेत.

(२२ एप्रिल १९९४)
■ ■

अन्वयार्थ - एक / २४६