पान:अन्वयार्थ - १ (Anvayarth -1).pdf/244

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

त्यांच्या साथीला खुद्द अमेरिकाच उतरली आहे. लहान मुले, तुरुंगातील कैदी इत्यादींनी तयार केलेल्या उत्पादनांचा वापर करणे मानवी हक्कांचा भंग आहे. ज्या देशात मानवी हक्कांचा भंग करून उत्पादनखर्च कमी ठेवला जातो त्यांच्या मालावर आयातशुल्क आकारण्याचाही अमेरिकेचा प्रस्ताव आहे. कार्ला हिल्स आणि स्वामी अग्निवेश यांची युती पोटात गोळा उठवणारी आहे.
 डंकेल प्रस्तावातील या शेवटच्या घडामोडीमुळे एक गोष्ट स्पष्ट झाली: थोरामोठ्यांच्या टकरीत 'भारता'सारख्या गरीब देशांचा फायदा होत होता. त्याला 'इंडिया'वाद्यांनी विरोध केला. अमेरिकेवर बोटे मोडून शिव्याशापांचा वर्षाव केला. तीच अमेरिका, तेच साम्राज्यवादी 'मजुरी वाढवा', 'पर्यावरण वाचवा', अशा घोषणा देत डंकेल विरोधकांच्या पंगतीला येऊन बसले आहेत.
 काँग्रेसचाही एक प्रशिक्षण वर्ग
 पण सगळ्यांत महाविनोदी दृश्य काँग्रेस पक्षात दिसते आहे. नेहरू, इंदिरा गांधींचा जयजयकार करणे, दिल्लीहून जी घोषणा येईल तिचा 'उदोउदो' करणे यापलीकडे बुद्धी म्हणून वापरायची नाही. हे व्रत काँग्रेस संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे. दिल्लीहून आदेश निघाला म्हणून बँकांचे राष्ट्रीयीकरण, संस्थानिकांचे तनखे रद्द असल्या धोरणांचे समर्थन करणे थोडेफार जमून जाते; पण डंकेल म्हणजे मोठे भानगडीचे प्रकरण. विरोधक त्याला कडाडून विरोध करीत आहेत, तेव्हा आपण त्याला पाठिंबा देणे चुकीचे असणार नाही, एवढे काँग्रेसवाल्यांना बरोबर समजले पण परवा परवापर्यंत "डंकेलमधील घातक प्रस्तावांचा शेतकऱ्यांवर आणि देशावर विपरीत परिणाम होऊ देणार नाही." अशी घोषण करणारे मुखर्जी, जाखड आज एकदम डंकेल प्रस्तावात सगळे काही 'आलबेल' आहे असे म्हणू लागल्याने काँग्रेसजनांच्या गोंधळात भर पडली. शरद पवार म्हणजे उद्याचे राष्ट्रीय नेतृत्व! साहेबांना सगळे काही समजते, असा त्यांच्या आसपासच्या कार्यकर्त्यांत बोलबाला आहे. साहेब इतक्या दिवस मूग गिळून बसले होते. परवा या विषयावर बोलले, "उत्पादनखर्चावर आधारित रास्त भाव पाहिजे असेल तर डंकेलला विरोध करून चालणार नाही." असे बेफाम विनोदी मराठी फार्सातील विदूषकाच्या तोंडी शोभणारे वाक्य बोलून गेले.
 पापांचा कबुलीजबाब द्या

 अद्भुत घडले. डंकेल विषयावर काँग्रेस कार्यकर्त्यांच्या प्रशिक्षणाकरिता जागोजाग कार्यशाळा भरवण्यात येत आहेत. एका कार्यशाळेचे कागदपत्र पाहण्यात आले. प्रशिक्षण देण्यासाठी स्थानिक पातळीवर कोणीच नाही, वरून थेट प्रणव

अन्वयार्थ - एक । २४५