पान:अन्वयार्थ - १ (Anvayarth -1).pdf/239

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

आश्चर्य ते कोणते? उत्तर प्रदेशातील पंतप्रधानांच्या सभांना पाच-पन्नास माणसेही जमत नव्हती, त्यांची सगळी वक्तव्ये कार्यकर्त्यांचा असलेला उत्साह गोठवणारी होती, याचा उल्लेख करुणाकरन समिती थोडीच करणार होती? दिल्लीश्वरांना सोयीस्कर समिती नेमली गेली, तिने दिल्लीश्वरांना सोयीस्कर निष्कर्ष काढले, दिल्लीश्वरांच्या निकटवर्ती गोटांनी याची बित्तम् बातमी वृत्तपत्रांना पुरवली. पवारांच्या अपराधाची चर्चा येत्या पंधरा दिवसांत काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत होणार आहे. त्यांच्याविरुद्ध कोणतीही कडक उपाययोजना केली जाणार नाही. महाराष्ट्रातील संभाजीचा संताप अनावर झाला तर काहीही हौतात्म्य स्वीकारतात, याची दिल्लीश्वरांना खबर आहे. शरद पवार काही संभाजीच्या प्रकृतीचे नाहीत; त्यांची जास्तीत-जास्त जयसिंगाबरोबर तुलना होईल, हे पुरा दिल्ली दरबार जाणतो. पवारांना संपविले तर सलतनीची हालत दख्खनमध्ये मुश्कील होईल हे दिल्लीश्वर चांगले जाणतात; पण पवारांना वाढू दिले तर उद्या आपलाही 'वसंतदादा पाटील' झाल्याखेरीज राहणार नाही. यांची त्यांनाही धास्ती आहे. दिल्लीशैलीची खास चाल अशी, की माणसे पदरी बाळगावी व त्यांचा तेजोभंग करून, काटछाट करून बाळगावी. हातात भूखंड प्रकरणातील सज्जड पुरावे मुंबईच्या मलबार हिलवरील 'अंगारिका' सोसायटीप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने दिलेला निकाल, बाळासाहेब विखे पाटील प्रकरणी उच्च न्यायालयाने झाडलेले ताशेरे, लखनौहून सरकारी विमानातून खुनी गुंडांना बरोबर प्रवासात आणल्याचे प्रकरण, इस्त्रालयमधील शस्त्र खरेदीचे प्रकरण, दाऊद इब्राहिम व इतर ख्यातनाम गुंडांबरोबरचे घनिष्ठ संबंध, पप्पू कलानी आणि हितेंद्र ठाकूर अशा बदनामांना पक्षाची तिकीटे दिल्याचे प्रकरण, अशा अनेक बेड्यांनी महाराष्ट्राचा आधुनिक संभाजी आधीच जेरबंद झाला आहे. मनोमिलनाच्या आधी विरोधकांत राहिल्यामुळे इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी आदींविरुद्ध केलेल्या अफाट वक्तव्यांमुळे पवारांची स्वामिनिष्ठा आधीच संशयास्पद होती, चंद्रशेखरांबरोबर मुलायम- कांशीराम युतीस समजता न समजता फायदेशीर ठरतील अशी वक्तव्ये पवारांनी केली, हे प्रकरण त्यांना आणखी कडीबेडीत घालणारे आहे. त्यांना कोणी संपविणार नाही, अधिकाधिक जखडून टाकतील. दिल्लीश्वरांचे हे असले राजकारण मराठ्यांना जमत नाही, म्हणून मराठा गडी दिल्लीत तरी अपयशाचा धनी ठरतो.
 मराठ्यांना हे का जमू नये?

 दिल्लीश्वरांची ही तंत्रे शरद पवारांनी वापरायला काय हरकत होती? भूखंड प्रकरणाचा शोध घेण्यासाठी एक चांगली समिती नेमायची; त्यावर नेमायचे

अन्वयार्थ - एक / २४०