पान:अन्वयार्थ - १ (Anvayarth -1).pdf/238

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

सीताराम केसरी. हा अहवाल अतिगोपनीय समजला जातो; पण या दोन नेत्यांच्या संदर्भातील माहिती फुटली, तिचा बोभाटा झाला. 'हिंदू' या वर्तमान पत्रात यासंबंधीच्या बातम्या झळकल्या, ही माहिती काँग्रेसच्या उच्चपदस्थ गोटांतून जाणीवपूर्वक फोडण्यात आली असावी.
 कुत्र्याला बदनाम करा
 श्री. शरद पवारांवरचा आरोप थोडक्यात असा : उत्तर प्रदेशाबाहेरील श्री. शरद पवार आदींनी केलेल्या विधानांमुळे काँग्रेसने लढाईपूर्वीच रणभूमीवरून पळ काढला असा गैरसमज लोकांमध्ये निर्माण झाला. श्री. शरद पवार यांनी निवडणुकांपूर्वी, 'उत्तर प्रदेशांत काँग्रेस आय ने निवडणूक लढवू नये,' असे म्हटल्याचे प्रसिद्ध झाले होते, श्री. शरद पवार यांनी, 'आपण तसे म्हटले नसल्याचे' व उत्तर प्रदेशांत काँग्रेस आय पक्षाने धर्मनिरपेक्ष शक्ती मजबूत करण्याच्या दृष्टीने भूमिका घ्यावी, असे म्हटले असल्याचा खुलासा केला होता. उत्तर प्रदेशातील हजारो काँग्रेस कार्यकर्त्यांचे म्हणणे असे, की या वक्तव्यांमुळे आम जनतेत असा समज पसरला, की खुद्द काँग्रेस नेत्यांनाच जिंकून येण्याची काही आशा नाही. भाजपला कोणत्याही परिस्थितीत सत्तेवर येऊ न देण्याचा निर्धार बहुसंख्य मुसलमान आणि मागासवर्गीयांनी केला होता, भाजपविरोधी सर्वांत सशक्त पक्षाला मते देण्याचा त्यांचा विचार ठरला होता. पवार आदी नेत्यांच्या वक्तव्यांमुळे सर्वांत प्रबल विरोधी मुलायम- कांशीराम युतीच ठरेल असे वातावरण तयार झाले आणि त्याचा फायदा युतीस मिळाला, काँग्रेसचे पानिपत झाले.
 दिल्ली दरबारातील कट कारस्थाने

 उत्तर प्रदेशातील काँग्रेसच्या पराभवाची मीमांसा करणे हा प्रस्तुतचा विषय नाही. दिल्लीतील आधुनिक 'बडा हिंदूराव' निष्प्रभ कसा होईल, यासाठी दिल्लीश्वरांनी वापरलेली तंत्रे अधिक कुतूहलाचा विषय आहे. पराभवाची मीमांसा करण्यासाठी समिती नेमली. समितीचे सदस्य कोण? अध्यक्ष करुणाकरन- पंतप्रधानांचे खास जानी दोस्त; केंद्रातील काँग्रेस सरकार डुगडुगत होते तेव्हा करुणाकरन माहिनो न् महिने दिल्लीत डेरा ठोकून होते. बॅ. अंतुले आणि प्रतिभाताई पाटील यांचे नाते शरद पवारांशी साप-मुंगूस आणि विळा-भोपळा यांच्यातील दोस्तीप्रमाणेच. महाराष्ट्रातील नेमकी हीच मंडळी समितीवर नेमली जावी हा निव्वळ अपघात असेल तर तो मोठा चमत्कार म्हणावा लागेल. समितीच्या सदस्यांची यादी पाहिल्यावर निष्कर्ष श्री. शरद पवारांच्या विरुद्ध निघाला यात

अन्वयार्थ - एक / २३९