पान:अन्वयार्थ - १ (Anvayarth -1).pdf/240

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

निष्ठावान बिल्डर किंवा जिल्ह्या-जिल्ह्यांत, भूखंड विषयाचा भरपूर अनुभव असलेले, 'निवास' स्पेशलिस्ट, त्यांच्याकडून निर्णय आणायचा, की सर्व भूखंड प्रकरणात शरदरावांचा काहीच दोष नाही. यापलीकडे जाऊन भूखंड प्रकरणातील खरे दोषी आपले विरोधकच आहेत, असे कागदोपत्री दाखविण्याचे कौशल्य पवारांकडे नसावे. त्यांनी ही तरकीब वापरली नाही असे नाही. मृणाल गोरेंना छोटासा फटका देण्याकरिता वापरली; पण निष्ठावान समितीच्या शिफारसींच्या आधाराने अंतुले, प्रतिभाताई पाटील यांनासुद्धा जेरबंद करण्याचे प्रयत्न ऐकिवात नाहीत. भूखंडाचा फायदा मिळवलेल्यांची नावे आपण जाहीर करतो असे या मराठेश्रेष्ठांनी म्हटले तर देशांतील आणि दिल्लीतील अनेकांच्या अंगाला कापरे सुटल्याखेरीज राहणार नाही.
 लखनौहून मुंबईला त्यांनी दोन गुंडांबरोबर प्रवास केला. मुंबईत आल्यानंतर जे.जे हॉस्पिटलमधील हत्याकांडात रक्तपात घडविला. या प्रकरणी शरद पवारांनी एक समिती नेमली असती, त्यात हितेंद्र ठाकर, पप्पू कलानी असे निवडक तज्ज्ञ घेतले असते. तर त्या विमानात आपण त्या गुंडांना शंकरराव चव्हाणांच्या शिफारसीवरून घेतले असा निष्कर्ष सहज काढता आला असता.
 मदनलाल बाफना यांच्या मंत्रालयातील फोनवरून दुबईत सतत संपर्क साधला जात होता. पवार आणि दाऊद इब्राहिम यांचे घनिष्ठ संबंध आहेत. याची सर्वदूर खात्री आहे; पण हे प्रकरण आपल्या अंगावर शेकू नये यासाठी पवारांना सोयीस्कर समिती नेमता आली असती आणि बॅ. गाडगीळ यांच्यामार्फत पंतप्रधानांनी पाठविलेल्या निरोपामुळे असे झाले असे सांगता आले असते. मुंबईच्या स्फोटातील चौकशीत मुरली देवरांपासून ते देशांतील सर्वोच्च पदाधिकाऱ्यांपर्यंत अनेकांचे हात गुंतले आहेत, असे आपल्या पुठ्यातील एखाद्या समितीकडून वदवून घेता आले असते. गेला बाजार हर्षद मेहताने मुंबईत ती प्रख्यात सुटकेस खरेदी केली याचा प्रत्यक्ष साक्षीदार पुढे करता आला असता.
 ...पण मराठ्यांना हे जमत नाही. महाराष्ट्राच्या राजकारणात साध्य साधनांचा विधिनिषेध नसलेले दिग्गज दिल्लीत पोहोचले, की डावपेचांच्या खेळांत कमी पडतात आणि मराठ्यांना दिल्ली कायमची दूर राहते.

(२५ मार्च १९९४)
■ ■

अन्वयार्थ - एक / २४१