पान:अन्वयार्थ - १ (Anvayarth -1).pdf/237

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.






बडा हिंदूराव आणि बादशहा


 दिल्लीला गेलेले महाराष्ट्राचे नेते तेथे फिके पडतात, असा मोठा लांब इतिहास आहे. सगळी दख्खन हलवून सोडणारा महादजी शिंदे, पहिल्या बाजीरावावर ढेकूळ फेकून मारणारा आणि त्याला अर्वाच्य शिव्या घालणारा; पण दिल्लीला गेल्यावर मनसदीची वस्त्रे घेऊन फक्त बडा हिंदूराव बनला. अलीकडच्या इतिहासात लोकमान्य टिळक, यशवंतराव चव्हाण इत्यादी महाराष्ट्रातील नरपुंगवांचा अनुभव काही फारसा वेगळा नाही, श्री. शरद पवार दिल्लीला धडकून परत आले. त्यांनी यापुढे काही वेगळा इतिहास घडवला नाही तर मराठ्यांना दिल्लीचे हवापाणी रुचत नाही आणि पचत नाही हे पुन्हा एकदा सिद्ध होईल.
 पराभवाचे खापर

 हे असे का होते? कारणे अनेक असतील; पण नुकत्याच घडलेल्या एका प्रसंगातून त्यातील एक किरकोळ का होईना, कारण लक्षात आले. १९९३च्या अखेरीस उत्तरेतील सहा राज्यांत निवडणुका झाल्या. त्यांपैकी उत्तर प्रदेशातील निवडणुकीत काँग्रेसचा पार धुव्वा उडाला. हा पराभव का, कसा झाला, या पराभवाला जबाबदार कोण याचे सत्यशोधन आणि विश्लेषण करण्यासाठी काँग्रेस पक्षाने एक समिती नेमली. या समितीच्या अध्यक्षपदी केरळचे मुख्यमंत्री के. करुणाकरन तर महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री बॅ. अब्दुल रहमान अंतुले, महाराष्ट्र प्रदेशच्या माजी अध्यक्षा प्रतिभाताई पाटील आणि जगन्नाथ मिश्रा इत्यादी सदस्य होते. समितीच्या अहवालात उत्तर प्रदेशाच्या काँग्रेस आयच्या पराभवास कारण झालेल्या अनेक घटकांची मीमांसा करण्यात आली आहे. विशेषतः पक्षाच्या दोन वरिष्ठ नेत्यांनी निवडणूक प्रचाराच्या काळात केलेल्या विधानांमुळे काँग्रेसला जबरदस्त धक्का बसला, अशी नोंद समितीने केली आहे. हे नेते म्हणजे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री. शरद पवार आणि केंद्रीय कल्याणमंत्री श्री.

अन्वयार्थ - एक / २३८