पान:अन्वयार्थ - १ (Anvayarth -1).pdf/236

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

सगळ्यात महत्त्वाची अट अशी, की मैदान तिरपेच असावे. 'बॉम्बे क्लब'चा संघ अंगण न बदलता कायम तिरप्या मैदानाच्या चढत्या भागातच खेळावा. 'बॉम्बे क्लब'च्या अंगणात येण्याची विरोधी खेळाडूंना मुभाच असणार नाही. याउलट क्लबच्या खेळाडूंना विरोधी पक्षाच्या गोलसमोर उभे राहून 'फ्री किक' मारण्याची परवानगी दर पाच दहा मिनिटांनी मिळाली पाहिजे. आता 'बॉम्बे क्लब'बरोबर असला खेळ खेळण्यास कोणी तयार नाही. उलट, साध्या सोप्या मैदानावर खेळण्याची 'बॉम्बे क्लब'ची तयारी नाही. ते मागतात 'सपाट मैदान; पण त्यांना हवे आहे त्यांच्या खेळाडूंना मदत करणारे 'तिरपे मैदान...'
 "नाचता येईना..."
 एवढ्याकरिता त्यांचा आकांत चालू आहे. भांडवली फायद्यावरील कराचे प्रमाण परदेशी आणि देशी गुंतवणुकीवर सारखेच असावे. समभागांची प्रमाणपत्रे गहाण ठेवून भांडवल उभारण्याची व्यवस्था अधिक सोयीस्कर पाहिजे, कंपन्यांवरील कर समान असावा. या त्यांच्या मागण्यांत पुष्कळ तथ्य आहे. देशात विजेचा पुरवठा अपुरा आणि अनियोजित आहे. कच्च्या मालाची गुणवत्ता कमी आहे. सरकारी 'इन्स्पेक्टर राज' आणि 'भ्रष्टाचार उत्पादकतेत बाधा आणतात. नोकरदारांच्या राजकीय ताकदीमुळे त्यांच्या मागण्या अवास्तव होत आहेत, या त्यांच्या तक्रारीत पुष्कळ अर्थ आहे; पण या सगळ्या अडचणी परदेशी भांडवलदारांना 'बॉम्बे क्लब'च्या सदस्यांपेक्षा अधिक जाचक आणि त्रासदायक होणार आहेत, कारण असल्या अजागळ व्यवस्थेत काम करण्याची परदेशी गुंतवणूकदारांना अजिबात सवय नाही. परदेशी गुंतवणूकदारांपेक्षा 'बॉम्बे क्लब'च्या खेळाडूंना अधिक अडचणींना तोंड द्यावे लागते आहे हे काही खरे नाही.
 'राघू मैने'च्या कथेतील राघूप्रमाणे 'बॉम्बे क्लब'च्या सदस्यांचा खेळ लबाडीचा आहे आणि आपल्या लबाडीच्या खेळाला सपाट मैदान हवे असा ते कांगावा करीत आहेत; पण त्यांच्या मनात कोणता खेळ खेळायचा आहे ते सांगत नाहीत. नाचता येत नसले, की 'अंगण वाकडे' म्हणावयाचे, अशी जुनी म्हण आहे, 'बॉम्बे क्लब'ची सपाट मैदानाची मागणी आणि 'अंगण वाकडे' असल्याची तक्रार या दोघांची जातकुळी एकच.

(४ मार्च १९९४)
■ ■

अन्वयार्थ – एक / २३७