पान:अन्वयार्थ - १ (Anvayarth -1).pdf/235

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

हुतूतू, खो-खो, आट्यापाट्या इत्यादींनाही सपाट मैदान लागते; पण, बहुतेक खेळात मैदानातील अंगण पाळीपाळीने बदलून घेण्याची व्यवस्था असल्याने मैदान सपाट नसल्याबद्दलची ठारशी तक्रार कधी ऐक येत नाही. मैदानातील एक भाग सरस असला आणि ते अंगण नाणेफेकीच्या निर्णयामुळे एका संघास मिळाले तर त्यांचे नशीब भले असे मानण्याचा खिलाडूपणा बहुतेक संघ दाखवितात.
 धावण्याच्या छोट्या अंतराच्या शर्यतीत मैदान सपाट असते; पण मॅरेथॉनसारख्या लांब अंतराच्या स्पर्धेत शर्यतीचा मार्ग थोडाफार वरखाली असला तरी त्यामुळे विजेत्यांना शर्यत पुरी करण्यास लागणाऱ्या वेळात फरक पडतो. स्पर्धेतील विजेता ठरण्यास त्यामुळे काही फारसा ठरक पडत नाही.
 काही खेळ सपाट मैदानावर खेळले जाऊच शकत नाहीत. सायकलच्या शर्यतींचा आधुनिक मार्ग कलताच असतो आणि हिवाळ्याच्या दिवसांत थंड प्रदेशातील बर्फावरून घसरत जायच्या अनेकविध स्पर्धांसाठी उतार लागतो. एवढेच नव्हे तर जितका उतार जास्त तितके उच्चांक वरचढ होतात.
 हिंदुस्थानातील कारखानदारांच्या 'बॉम्बे क्लब'ला सपाट मैदान हवे आहे; पण ते नेमके कोणत्या खेळासाठी? याचे स्पष्ट उत्तर मिळाले नाही तर मैनेसारखी फसगत होईल. "बरं, चला तुम्हाला सपाट मैदान दिले," असे आपण कबूल केले, अशा कल्पनेने, की 'बॉम्बे क्लब'ला बहुतेक हॉकी, फुटबॉलसारखा खेळ खेळायचा असेल, तर एक धोका आहे. सपाट मैदान मिळाल्यावर 'बॉम्बे क्लब'च्या खेळाडूंनी स्कीइंग करण्याचा आग्रह धरला आणि बर्फावरून तुफान वेगाने कड्यांवरून शरीर फेकीत जाण्याची जिवघेणी स्पर्धा सपाट मैदानावर खेळण्याचा आग्रह धरला तर कोणी खेळाडू त्यांना खेळात काय म्हणून सामील करून घेईल?
 कारखानदारांच्या क्रीडा

 कारखानदारांच्या या क्लबला नेमका कोणता खेळ खेळायचे आहे? स्वातंत्र्यानंतरच्या काळात कारखानदारांना काही वेगळेच खेळ खेळण्याच्या सवयी लागल्या आहेत. समोरच्या खेळाडूंनी एक पाय बांधून, एक हात पाठीशी ठेवून किंवा डोळ्यांवर काळी पट्टी बांधून घेऊन मैदानात उतरावे, म्हणजे हे बहाद्दर मैदानात उभे तरी राहतील अशा अटी घालून खेळायची त्यांना सवय. सर्व जगात सर्वांत जास्त संरक्षण असलेले कारखानदार म्हणजे हिंदुस्थानचे. 'सपाट मैदाना'च्या भाषेत बोलायचे झाले तर 'बॉम्बे क्लब'च्या फुटबॉल संघाची

अन्वयार्थ – एक / २३६