पान:अन्वयार्थ - १ (Anvayarth -1).pdf/234

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

राहण्याची होत नाही. गोष्टीतील राघूही मोठा विचित्र. त्याच्या मनात सगळी कमाई स्वतःच मटकावण्याचे होते, तर दररोज 'आतले की बाहेरचे?' अशी पसंती विचारण्याची त्याला काही आवश्यकता नव्हती. सगळे मिळालेले खाद्य फस्त करून तो घरी आला नसता तरी मैने धुंडून आणलेल्या खाद्याचा थोडा तरी वाटा त्याला हडप करता आलाच असता. आणखी एक महत्त्वाचा मुद्दा. तीनही दिवसांच्या खेळात मैना हरली असा योगायोग अपघाताने ठारसा संभवत नाही. खारीक, बदाम, जरदाळू असा तीनही प्रकारचा सुका मेवा राघूजवळ असला पाहिजे आणि मैनेच्या उत्तराच्या अनुरोधाने स्वतःला सोयीस्कर अशी चीज तो बाहेर काढत असला पाहिजे.
 'बॉम्बे क्लब'चा राघू

 स्त्रियांच्या अवस्थेचे रूपक म्हणून ही कथा निरर्थक आहे. मग या गोष्टीचा अर्थ तरी काय? फारसे स्पष्ट होत नव्हते; पण महिन्यापूर्वी डोक्यात लखकन प्रकाश पडला आणि राघू-मैनेच्या कथेचा काहीसा खोल आणि व्यापक अर्थ लागू लागला.
 मुंबई 'बॉम्बे क्लब' हे नाव अलीकडे गाजत आहे. क्लब म्हटले, की त्याचा संबंध खेळाशी आला. मग तो खेळ कोणताही असो, साध्या पत्त्यांचा ब्रिज, रमी इत्यादी पैसे लावून होणारा जुगारी पत्त्यांचा खेळ, बुद्धिबळ इत्यादी बैठ्या खेळांपासून पोहणे, क्रिकेट, मुष्टियुद्ध अशा अनेक खेळांच्या सोयीसुविधा क्लब नावाच्या संस्था आपल्या सदस्यांना उपलब्ध करून देतात. खरे म्हटले तर 'बॉम्बे क्लब' हा काही अशा खेळांशी संबंधित असलेल्या क्लबपैकी नाही, या क्लबचे सदस्य देशभरातील प्रख्यात विख्यात कारखानदार, व्यापारी आदी मंडळी आहेत. कधीकाळी त्यांचा खेळांशी संबंध आला असेल तर त्याची लक्षणे बहुतेकांच्या शरीरावर आज तरी दिसत नाहीत. तरीही या मंडळीचा 'बॉम्बे क्लब' म्हणजे खेळाची जागा आहे, असा एक सार्वत्रिक गैरसमज पसरला. त्याचे कारण असे, की क्लबच्या स्थापनेच्या दिवशीच सदस्यांनी एकमताने 'सपाट मैदानाची' मागणी केली. 'आम्ही स्पर्धात्मक खेळांसाठी तैयार' आहेत. जगातील कोणाही खेळाडूपेक्षा आम्ही कमी नाही; पण मैदान सपाट मिळाले पाहिजे," अशी त्यांनी मागणी केली.
 मैदान दाखवा, खेळ नंतर ठरवू
 'बॉम्बे क्लब'ला कोणत्या खेळाच्या स्पर्धेत उतरायचे आहे ते काही स्पष्ट झाले नाही. हॉकी, फुटबॉल यांना चांगले सपाट मैदान लागते. भारतीय खेळातील

अन्वयार्थ - एक / २३५