पान:अन्वयार्थ - १ (Anvayarth -1).pdf/233

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.






'बॉम्बे क्लब'चे सपाट मैदान आणि वाकडे अंगण


 हानपणच्या शालेय पाठ्यपुस्तकातून राघू-मैनेची एक गोष्ट होती. मराठी दुसरी-तिसरीच्या वयात, 'पुरुष जात तेवढी निमकहराम' असा निष्कर्ष काढणारा धडा देण्यात संपादकांचा आणि शाळा खात्याचा काय हेतू असेल तो आजदेखील उमजत नाही. त्यावेळीदेखील हा धडा काही इतर वेच्यांपेक्षा वेगळा आहे, विचित्र आहे याची कुठेतरी अंधुकशी जाणीव भासत होती.
 राघू-मैनेच्या गोष्टीचा थोडक्यात सारांश असाः संध्याकाळी राघू घरट्यात परत येतो आणि त्याला मिळालेले खाद्य लपवून ठेवून, मैनेला विचारतो, 'आतले पाहिजे की बाहेरच?' मैना बिचारी भोळी. ती मागते आतले. राघू दडवलेली खारीक काढतो, वरचा गोड गर खाऊन टाकतो आणि मैनेच्या अंगावर आतले बी फेकून देतो. मैना बिचारी उपाशीपोटी त्या खारकेच्या बीशी झेलझेल खेळत राहते. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी राघू पुन्हा तोच प्रश्न विचारतो, 'आतले की बाहेरचे?' आदल्या दिवसाच्या अनुभवाने शहाणी झालेली मैना या वेळी बाहेरचे मागते. राघू हसत-हसत बदाम काढतो, तो फोडून बाहेरचे कवच मैनेकडे देतो आणि आतले बदाम बी खाऊन टाकतो. तिसऱ्या दिवशीही हीच कथा. आतले मागितले तरी आपण फसतो, बाहेरचे मागितले तरी तीच स्थिती, या अनुभवाने शहाणी झालेली मैना उत्तर देते, 'आतले नको आणि बाहेरचे नको; मला मधले द्या.' राघू दडवलेला जरदाळू काढतो वरचा गर काढून स्वतःकडे ठेवतो, मधले बी फोडून कवच तेवढे मैनेकडे फेकतो आणि गर्भातला गर पुन्हा स्वतःच मटकावतो.

 स्त्री-मुक्तीवाल्यांचा संदेश पोचविण्यासाठी या गोष्टीचा खरे म्हटले तर फारसा उपयोग नाही. शहरी मध्यमवर्गीय महिलांप्रमाणे पक्षिणी नवऱ्याने आणलेल्या मिळकतीवर जगत नाहीत. तेव्हा मैनेची स्थिती राघूने फसवले म्हणून उपाशीपोटी

अन्वयार्थ - एक / २३४