पान:अन्वयार्थ - १ (Anvayarth -1).pdf/232

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

सेलेस हिच्यावर भर क्रीडांगणावर टेलिव्हिजनच्या कॅमेऱ्यासमोर चाकूहल्ला केला. मोनिका अजूनही हल्ल्याच्या जखमेतून सावरलेली नाही, स्टेफी ग्राफ सर्वोच्च खेळाडू बनली आहे. मोनिकाचे नाव जवळजवळ ऐकू येत नाही.
 लिलहॅमर येथे बर्फावरील खेळांच्या आलिंपिक स्पर्धा चालू आहेत. अमेरिकन संघाच्या निवडीच्या वेळी बर्फावरील नृत्यातील अमेरिकन निष्णात नर्तिका नॅन्सी करीगन हिच्यावर हल्ला झाला. अमेरिकेतील तिची स्पर्धक नर्तिका टोनिया हार्डिंग आणि तिच्या मित्रांनी अमेरिकेच्या ऑलिंपिक संघात स्थान मिळावे म्हणून हा हल्ला ठरवून केला असा कबुलीजबाब टोनियाच्या घटस्फोटीत नवऱ्याने दिला.
 तया यातना कठीण
 खेळ म्हणजे नुसती गंमत नाही. खेळ म्हणजे प्रचंड प्रयास, कष्ट, व्यायाम. खेळातील खेळपण नष्ट व्हावे इतका देहदंड. स्पर्धेत बक्षिसापोटी सोन्याच्या राशी असतील; पण स्पर्धा इतकी जिवघेणी की शिखरावर वर्ष-सहा महिनेदेखील टिकून राहणे कठीण. व्यावसायिक आंतरराष्ट्रीय खेळ आणि आमचे लहानपणचे उंडगणे यातला फरक या दोन हल्ल्याच्या घटनांनी चटकन मनावर बिंबला आणि पटले, की खेळाडूंना मिळणारी प्रसिद्धी आणि धनराशी यातील कण अन् कण घाम, रक्त आणि अश्रू यांच्या थेंबाथेंबांनी कमावलेला आहे.
 मुंग्यांचे उदरभरण सुलभ झाले आहे, टोळांचे बागडणे असे थाटाचे झाले आहे की त्यासाठी त्यांना मोठे सायास करावे लागतात.

(१८ मार्च १९९४)
■ ■

अन्वयार्थ - एक / २३३