पान:अन्वयार्थ - १ (Anvayarth -1).pdf/231

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

जागतिक प्रावीण्य मिळवणारे खेळाडू एका एका स्पर्धेत कोटी कोटी रुपये मिळवतात असे ऐकले किंवा वाचले, की मीही हबकून जातो. खेळण्याबद्दल आपली पोटापुरती भाजीभाकरी मिळावी इतपत ठीक आहे; पण वर्षानुवर्षे कष्ट करून विद्याभ्यास करणाऱ्या हुशार कष्टाळू विद्यार्थ्यांपेक्षा खेळाडूंना शेकडोपट उत्पन्न मिळावे, त्यांचे नाव व्हावे आणि सन्मानही व्हावा हे अद्भुत वाटते.
 आधुनिक घरात आमच्या लहानपणच्या घरच्यापेक्षा अगदी वेगळ्या प्रकारचे नाटक घडत असले पाहिजे. मुलगा खोलीत वाचत बसला आहे, बाप घरी येतो आणि मुलाला म्हणतो, "अरे, तू घरात वाचत काय बसला आहेस? बाहेर जा टेनिस खेळ. अरे, त्या सांप्रासचे काही आदर्श समोर ठेव, निदान विजय अमृतराजचा. तो बघ कांबळी, काय नाव कमावतो आहे! तुला लेका आम्ही सर्व काही संधी आणि पाहिजे ती साधने द्यायला तयार आहोत, तू खेळत का नाहीस. अभ्यास करून तुला काय मिळणार आहे." आणि मुलगा म्हणतो "बाबा भूमितीचे एवढे प्रमेय सोडवतो आणि मग पाहिजे तर खेळायला जातो."
 नव्या युगातील टोळ
 तुमच्या वर्षभराच्या, कसेबसे उभे राहू लागलेल्या, मुलाने नाव रोशन करावे असे वाटत असेल तर आतापासून त्याच्या हाती क्रिकेटची बॅट द्या, टेनिसची रॅकेट द्या. तो जलतरणपटू व्हावे असे वाटत असेल तर त्याला बिनधास्त पाण्यात सोडून द्या.
 खेळ ही करिअर! आनंदही आणि पैसाही! त्यावर आणखी प्रसिद्धीचा झोत आणि कीर्तीचा लखलखाट! आमचे उंडगणे आणि आजच्या शिखरावरील खेळाडूंची खेळात कुशलता साधण्याकरिता केलेली तपस्या यात जमीन-अस्मानचा फरक आहे, हे चांगले समजते आणि उमजते. पंचपंच उष:काली उठून थंड पाण्याने स्नान करून योगाभ्यासाला लागणाऱ्या महामुनीपेक्षा शरीरसौष्ठव आणि बांधेसूदपणा टिकविण्यासाठी चित्रपटातील आधुनिक चटकचांदणीचे प्रयास अधिक खडतर आहेत हे समजूनही जुन्या नैतिकतेत घडलेल्या मनाला काहीतरी चुकते आहे असे वाटते.
 जागतिक पातळीवर पटुता मिळवण्याकरिता लागणारे कष्ट कितीही कठोर असोत, शेवटी खेळ तो खेळ आणि अभ्यास तो अभ्यास असे वाटत राहते.
 जया अंगी टोळपण

 मग एकदम एक घटना घडली. स्टेफी ग्राफ सर्वोच्च मानांकित टेनिस खेळाडू या पदावर चढावी यासाठी तिच्या एका भक्ताने अग्रणी खेळाडू मोनिका

अन्वयार्थ - एक । २३२